वसई : वाहन घोटाळ्याप्रकरणी विरारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत परिवहन विभागाने एकूण ४ वाहने जप्त केली आहेत. त्यात २ बस आणि २ मालवाहतूक करणार्‍या वाहनांचा समावेश आहे. वसई विरार शहरात अशा प्रकारची ६० हून अधिक वाहने असल्याचा संशय असून त्याचा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शोध घेण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासगी बसेसची परराज्यांतून बेकायदेशीरपणे नोंदणी करून ती वापरात आणल्याचा एक प्रकार नुकताच वसई विरार शहरात उघडकीस आला होता. अशाप्रकारची अनेक बेकायदेशीर वाहने रस्त्यावर धावत असल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन विभागाने केली होती. भंगारात गेलेली वाहने दुरूस्त करून किंवा चोरीच्या इंजिनाच्या आधारे पुनर्निमाण करून आणली जात असण्याची शक्यता आहे. सर्वच शहरात अशी वाहने असून या गुन्ह्याची व्याप्ती राज्यभर पसरली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांकडून एका बसचा मालक प्रवीण राऊत याच्याविरोधात फसवणुक तसेच बनवाट दस्तावेज बनविल्याप्रकरणी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : वसई : रेल्वे अपघातात २२४ जणांचा बळी; मीरारोड ते वैतरणा स्थानकादरम्यान १५७ जण जखमी

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रादेशिक विभाग सावध झाला आहे. वाहनांची कसून तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आली होती. सुमारे शहरात ६० बेकायदेशीर वाहने धावत असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान ४ बेकायदेशीर नोंदणी असलेली वाहने सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत. यात दोन खासगी बसेस व दोन टिप्पर वाहनांचा समावेश आहे. जशी जशी वाहने आढळून येत आहेत त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा : वाहनांचे क्रमांक अचूक टिपणार्‍या कॅमेर्‍याचा फायदा; एका वर्षात वसई, ठाणे, मुंबईतील ९० गुन्हे उघडकीस

काय आहे वाहन घोटाळा

वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) केली जाते. वाहनांची नोंदणी करता त्याचे इंजिन आणि चेसीस क्रमांक तपासले जाते आणि मग अधिकृत नोंदणी करून क्रमांक दिला जातो. राज्यात ८ वर्ष जुन्या वाहनांवर बंदी आहे. त्यामुळे ही भंगार झालेली वाहने परराज्यात फेरफार करून नोंदणी करून राज्यातील रस्त्यावर आणली जात असल्याची एक शक्यता आहे. तर चोरीच्या वाहनांचे इंजिन वापरून बनवलेली ही वाहने असल्याची आणखी एक शक्यता आहे.

हेही वाचा :वसईतून बेपत्ता दोन अल्पवयीन मुलींची तुंगारेश्वर जंगलातून सुटका, तबेल्यात काम करणार्‍या कामगाराला अटक

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर खासगी कंपन्या आणि औद्योगिक वसाहती आणि शाळा आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच कंपन्यांना कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी बसेसची आवश्यकता असते.तर मालवाहतूक करण्यासाठी ही टिपर वाहने वापरली जातात. त्यामुळे ही नादुरूस्त वाहने फेरफार करून पुन्हा वापरात आणली जात आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून प्रदूषणातही वाढ होत आहे. “या वाहन घोटाळ्याप्रकऱणी परिवहन विभागाच्या वायू वेग पथकाकडून तपास प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांमार्फत कायदेशीर गुन्हे दाखल कऱण्यात येत आहेत.” -प्रवीण बागडे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai rto seized 4 vehicles in the city illegal vehicle scam case css
Show comments