वसई: वसईतील पहिल्या पिढीतील पत्रकार आणि शिक्षक हरिहर बाबरेकर यांचे बुधवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गुरूवारी सकाळी वसईच्या पाचूबंदर येथील स्मशानभूमीत बाबरेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हरिहर बाबरेकर वसईच्या न्यू इंग्शिल शाळेत ३८ वर्षे शिक्षक म्हणून काम करत होते. शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला. महाराष्ट्र टाईम्स या दैनिकात वसई वार्ताहर म्हणून कार्यरत होते. बलवंत, वास्तव, स्वेद आदी अनेक नियतकालिकांमधून त्यांनी महारूद्र, इंद्रभूषण, आत्रेय या नावाने लेखन केले. ३० वर्षे ते वसईच्या पत्रकारितेत सक्रीय होते. उद्योगमहर्षी आर.के.चुरी आणि बाबासाहेब जोशी यांचे चरित्र, परिचय, संवत्सरी या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. शेैक्षणिक, सांस्कृतिक आणि पत्रिकारिते मधील उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना भैयाजी काणे पुरस्कार, महर्षी यज्ञावाल्यव्य पुरस्कार, वसई विरार महागनर पत्रकार संघाचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : भाईंदर: रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण; लाईफ लाईन रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्चमार्‍यांविरोधात गुन्हा

वसई विरार महानगर पत्रकार संघाचे बाबरेकर सल्लागार होते. त्यांनी नभोवाणी वरून इतिहास, मराठी काव्य यावर शैक्षणिक पाठ दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी बाबरेकर यांना कर्करोगाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली होती. बुधवारी संध्याकाळी अचानाक त्यांचा रक्तदाब वाढला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा वैभव, विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. गुरूवारी सकाळी साडेनऊ पारनाका येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai senior journalist harihar babrekar passes away at the age of 81 css