वसई : प्रेयसी आणि तिच्या मुलाची हत्या करणार्‍याला किरण मकवाना या हिरे व्यापाराला वसईच्या सत्र न्यायालयाने दोषी सिध्द ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०१५ मध्ये नालासोपारा पूर्वेच्या एव्हरशाईन येथे ही घटना घडली होती. किरण मकवाना (३७) हा हिरे व्यापारी आहे. तो सोनाली चेंबूरकर (३२) या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये रहात होता. सोनालीचा मुलगा कुणाल हा देखील त्यांच्या सोबत रहात होता. १६ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी मकवाना याने घरातील हातोडी आणि चाकूने सोनालीवर वार केले. त्यावेळी सोनालीचा मुलगा कुणाल (१८) हा आईला वाचविण्यासाठी मध्ये पडला. मात्र मकवाना याने त्याच्यावर देखील वार केले. सोनाली आणि कुणाल मयत झाल्यानंतर मकवाना याने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात मकवाना याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

या प्रकरणाची सुनावणी वसईच्या सत्र न्यायालयात झाली. तुळींज पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी या प्रकरणी तपास करून भक्कम पुरावे गोळा केले होते. परिस्थितीजन्य पुरावे, हत्या प्रकरणात जप्त केलेला चाकू, आरोपीचा जबाब आदी पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले आणि किरण मकवाना याला दोषी सिध्द केले.न्यायालयाने किरण मकवाना याला कलम ३०२ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास शिक्षेची तजवीज केली.एकही साक्षीदार नसताना आम्ही गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालायने ही शिक्षा ठोठावली याबाबत कबाडी यांनी समाधान व्यक्त केले. आरोपीला फाशी व्हायला हवी होती असेही त्यांनी सांगितले.

नेमके प्रकरण काय?

किरण मकवाना हा हिरे व्यापारी आहे. तो २०११ पासून नालासोपारा पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील साई सेवा अपार्टमेंट मध्ये राहत होता. त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्याला जान्हवी आणि लक्ष अशी दोन मुले होती. न्यायालयाने या मुलांचा ताबा किरण मकवाना याच्याकडे दिला होता. दरम्यान किरण मकवाना याचे सोनाली चेंबूकर (३२) या महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सोनाली तिचा मुलगा कुणाल (१८) याच्यासोबत मकवाना याच्यासोबत राहू लागली होती. परंतु सोनाली किरण मकवानाच्या दोन्ही मुलांना चांगली वागणूक देत नव्हती. त्यामुळे त्याची मुले त्याला सोडून आईकडे निघून गेली होती. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाले होते.