गोखिवरे येथील नवीन कार्यालयासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी परिवहन आयुक्तालयाकडे
कल्पेश भोईर
वसई : वसईच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाची गोखिवरे येथील नवीन प्रस्तावित जागेतील अडचणी दूर झाल्याने नवीन परिवहन कार्यालय उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करून परिवहन विभाग आयुक्तालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
सन २०११ पासून विरार पूर्वेच्या चंदनसार येथे अपुऱ्या जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. वसईसह पालघर जिल्ह्यतील आठ तालुक्यांचा कारभार या केंद्रातून चालवला जातो. मात्र हे कार्यालय शहरापासून लांब असल्याने वाहनधारकांची आणि नागरिकांची गैरसोय होत असते. त्यामुळे वसई-विरार शहरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे केंद्र असावे यासाठी शासनातर्फे डिसेंबर २०१६ मध्ये गोखिवरे येथे जागा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच फेब्रुवारी २०१७ मध्ये गोखिवरे येथील जागा परिवहन विभागाच्या नावे करण्यात आली होती. मात्र या जागेबाबत न्यायालयात दावा दाखल केल्याने या जागेत नवे अद्ययावत केंद्र उभारण्याचे काम रखडले होते. न्यायालयानेही या जागेच्या संदर्भात हिरवा कंदील दाखविल्याने नवीन कार्यालय उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सव्र्हे क्रमांक २३३/१ येथील ३.३ हेक्टर या जागेत कार्यालयीन इमारत व अद्ययावत वाहने पासिंग व तपासणी प्रमाणपत्र केंद्र तयार केले जाणार आहे. हे केंद्र ऑटोमॅटिक स्वरूपाचे होणार असल्याने यात मनुष्यबळाचा होणारा वापर हा कमी होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १६ ते १७ कोटींचे अंदाजपत्रक तयार करून देण्यात आले आहे. हे तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकासह नवीन कार्यालय तयार करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून परिवहन विभाग आयुक्तालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिली आहे. विविध कामांनिमित्त येणाऱ्या वाहनधारकांना चांगल्या प्रकारची सुविधा देण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही वाघुले यांनी सांगितले आहे.
वाहनधारक, कर्मचाऱ्यांना दिलासा
- विरार पूर्वेच्या चंदनसार येथील अपुऱ्या असलेल्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात कार्यालयीन कामकाज सुरू आहे.
- दररोज या कार्यालयात ३५० ते ४०० नागरिक हे वाहने नोंदणी, परवाना, बॅच, पासिंग यासह विविध कामांसाठी येतात.
- कार्यालयाची गेल्या चार ते पाच वर्षांपासून दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. अशा धोकादायक स्थितीत येथील कर्मचारी व नागरिक यांना या ठिकाणी वावरावे लागत आहे. नवीन कार्यालय तयार होणार असल्याने सद्यस्थितीत निर्माण होत असलेल्या समस्या सुटून लवकरच वाहनधारक व कर्मचारी यांना दिलासा मिळणार आहे.
गोखिवरे येथे परिवहन कार्यालयासाठीच्या जागेचा प्रश्न आता सुटला आहे. त्या जागेत कार्यालय इमारत व पासिंग व तपासणी प्रमाणपत्र केंद्र तयार करण्यासाठी परिवहन कार्यालयात प्रस्ताव दिला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कामकाज सुरू होईल.
– दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी, वसई.