वसई: वसईच्या वासळई येथील तलाठी विलास करे पाटील याने कार्यालयात कामासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. संतप्त झालेल्या वसईकरांनी बुधवारी तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. अखेर विनयभंग करणाऱ्या तलाठ्यावर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील आठवड्यात सातबार्‍याचा फेरफार करण्याच्या कामासाठी एक महिला वासळई येथील तलाठी कार्यालयात गेली होती. त्यावेळी तलाठी विलास करे पाटील याने या महिलेशी अश्लील वर्तन करून विनयभंग केला होता. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे तीव्र पडसाद वसईत उमटले आहेत. या तलाठ्याच्या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी विविध संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी एकत्र येत सकाळी ११ वाजता वसईच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत श्रुंगारत्याग आंदोलन केले. तलाठ्याने केलेले कृत्य हे अतिशय गंभीर असूनही महसूल व पोलीस अधिकारी या तलाठ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या तलाठ्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली होती.

हेही वाचा – वसई : तलाठ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग, वसईत संतापाची लाट

आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर वसई तहसीलदार डॉ अविनाश कोष्टी अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेसाठी आले. यावेळी त्यांनी तलाठ्याने जे गैरकृत्य केले आहे त्याबाबत आम्ही तातडीने निलंबनाचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर त्या तलाठ्याचे निलंबनाचे आदेशही दिले असल्याचे कोष्टी यांनी सांगितले आहे. ज्या दिवशी प्रकार घडला तेव्हापासून त्याचे निलंबन करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निवेदनासह स्त्रीचा संपूर्ण शृंगार शासनाकडे सुपूर्द करण्यात आला.

या आंदोलनात कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरेगट) तसेच मी वसईतकर अभियान, शिक्षक संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व महिला सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा – वसई : पोलीस आयुक्तालयातील ५ पोलिसांना बढत्या

पोलिसांची भूमिका संशयास्पद ?

महिलेच्या विनयभंगाप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर विनयभंग करणाऱ्या तलाठ्याला लगेच जामीन मिळाला. त्यामुळे पोलिसांची भूमिका यात संशयास्पद असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी करून पुरावे गोळा करून सादर करणे गरजेचे असताना पोलीस त्या तलाठ्याला पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची पोलिसांनी निपक्षपाती चौकशी करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai talathi who molested the teacher was finally suspended angry vasai people protest at tehsildar office ssb