वसई – शिकवणी शिक्षिकेने केलेल्या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेली दिपिका पटेल ही १० वर्षांची चिमुकली मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतली आहे. ती तब्बल २२ दिवस कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होती. तिच्यावर विविध शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

नालासोपारा पूर्वेच्या ओस्वाल नगरी येथील अंबाराम पटेल (३२) हे किराणा दुकान चालवतात. त्यांची १० वर्षांची मुलगी दिपिका ५ व्या इयत्तेत शिकते. याच परिसरात असलेल्या रिना क्लासेसमध्ये दिपिका खासगी शिकवणीसाठी जाते. ५ ऑक्टोबर रोजी ती वर्गात मस्ती करत असल्याने शिकवणी घेणारी शिक्षिका रत्ना सिंग (२०) हिने दिपिकाच्या उजव्या कानाखाली हाताने जोरदार थप्पड मारली. यामुळे तिच्या कानातील कर्णफुलाचा मागील भाग कानाच्या पाठीमागील बाजूस लागून दुखापत झाली. या मारहाणीमुळे दिपिकाचे तोडं बंद झाले आणि कान सुजून दुखत होता. सुरवातीला तिला विरारच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. होते. मात्र दुखणे वाढल्याने तिला १३ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ती तब्बल २२ दिवस कृत्रिमश्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटवर) मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या श्वसनलिकेसह मेंदूला ईजा झाली असून तिच्यावर मुंबईच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिच्या जगण्याची आशा सोडली होती. तिच्यावर विविध शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. अखेर तिचे प्राण वाचविण्यात यश आले. सव्वा महिने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात राहून ती घरी परतली आहे. यामुळे पटेल कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा – पालघर जिल्ह्यातील पहिले स्वतंत्र अवयव प्रत्यारोपण, वसईत मेंदू मृत महिलेच्या अवयवदानामुळे ६ जणांना जीवनदान

हेही वाचा – ‘ठाकूर’शाही संपवण्यासाठी दुबे प्रकरणाचा वापर; विधानसभेतील विजयानंतर आता पालिकेच्या नियंत्रणासाठी भाजपची व्यूहरचना

माझ्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आता ती बोलू शकते आणि खाऊ शकते. ती वाचली हाच मोठा आनंद आहे असे तिचे वडील अंबाराम पटेल यांनी सांगितले. या दरम्यान दिपिकाच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च आल्याने पटेल कुटुंबिय कर्जबाजारी झाले आहेत. माझी मुलगी सुखरूप आहे परंतु तिला मारहाण करणारी शिक्षिका अद्याप मोकाट आहे. तिच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्ष त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात रत्ना सिंग विरोधात कलम १२५ (अ) (ब) तसेच बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदाच्या अधिनिमय ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader