वसई: मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात बेवारस वाहनांचा प्रश्न जटिल बनला आहे. या बेवारस वाहनांमुळे रहदारीला अडथळे ठरू लागली आहेत. अशा बेवारस वाहनांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण करून बेवारस वाहने हटविली जाणार आहेत. आतापर्यंत सर्वेक्षणात ३५ ते ४० बेवारस वाहने आढळून आली आहेत.
वसई विरार शहरात वर्षानुवर्षे रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहने व भंगार साहित्य यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. त्यासोबत शहरातील वाहतुकीस अडथळा तयार होऊन वाहने चालविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शहरात आधीच रस्ते अरुंद व वाहनांची संख्या अधिक आहे. त्यातच बेवारस व भंगारात गेलेली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून रस्ते गिळंकृत होऊ लागले आहेत.
वर्षानुवर्षे वर्षे ही वाहने एका जागीच उभी राहत असल्याने समस्या निर्माण होत असतात. अशा वाहनांमुळे वाहतुकीला अडथला निर्माण होत असतो. याशिवाय रस्त्यावरून नागरिकांना ये जा करणेही अडचणीचे ठरते. तर दुसरीकडे या वाहनांचा गैरवापर होण्याचीशी शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वाहने ही तशीच पडून असल्याने अशा वाहनांत आजूबाजूच्या भागातील लहान मुले ही खेळण्यास जात असतात त्यामुळेही एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असते. शहरातील रस्त्यांची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही वाहने व भंगार साहित्य रस्त्यावर पडून राहिल्याने योग्य रित्या स्वच्छता करता येत नाही.
नागरिकांनी ही बेवारस वाहने हटविण्यात यावी अशी मागणी केली होती. या सर्व समस्या लक्षात घेऊन पालिकेने आता शहरातील बेवारस वाहने व रस्त्यावर ठेवून देण्यात आलेले भंगाराचे साहित्य हटविण्यावर लक्ष केंद्रित केले असून पुन्हा एकदा ही मोहीम तीव्र पणे राबवून शहरातील रस्त्यावर व रस्त्यालगत असलेली वाहने हटवून वाट मोकळी केली जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. याबाबत महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार य यांनी सर्व प्रभाग समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार भंगारात पडून असलेल्या बेवारस वाहनांवर सर्वेक्षण करून कारवाई केली जाणार असून यामुळे रस्ते मोकळे होणार आहेत.
सर्वेक्षणात आतापर्यंत ३७ वाहने
वसई विरार महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात प्रभाग समिती सी मध्ये २० तर प्रभाग समिती आय मध्ये अशा प्रकारची भंगारात पडून असलेली १७ वाहने आढळून आली आहेत. परिवहन सेवेचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर म्हणाले की, सर्व प्रभाग समितींमधील सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर अशा बेवारस आणि भंगारात पडून असलेल्या वाहनांना टोईंगच्या माध्यमातून उचलून त्यांची विल्हेवाट लावली जाईल.