वसई : वसई विरार महापालिकेने मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला आहे. यंदाच्या चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत दीडशे कोटींचा मालमत्ता कर वसुलीचा टप्पा पूर्ण केला आहे. वसई विरार भागात ९ लाखांहून अधिक छोटय़ा मोठय़ा औद्योगिक वसाहती, उपाहारगृहे, इमारती, सदनिका अशा विविध मालमत्ता आहेत. या मालमत्ता करातून पालिकेला उत्पन्न मिळते. यावर्षी पालिकेने ५०० कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने चांगलीच कंबर कसली आहे.
मालमत्ता कराचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रभागनिहाय मालमत्ता कर वसुलीचे नियोजन कर्मचाऱ्यांना आखून दिले आहे. त्यानुसार मालमत्ताधारकांना कराच्या नोटिसा बजावणे, करभरणा शिबिरे, प्रशासन आपल्या दारी उपक्रम, मालमत्ताचा शोध घेणे, तसेच वर्षांनुवर्षे जे कर भरणा करीत नाहीत अशा करधारकांच्या मालमत्ता सील करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या चालू आर्थिक वर्षांत कर संकलन होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मागील वर्षी दीडशे कोटीची वसुली ही आर्थिक वर्षांच्या जानेवारी महिन्यात पूर्ण झाली होती. यावर्षी पालिकेने चालू आर्थिक वर्षांच्या ऑक्टोबर महिन्यातच दीडशे कोटींचा मालमत्ता कर वसूल केला असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. यंदाच्या वर्षी मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला जात आहे. जलदगतीने कराची वसुली होण्यासाठी कर थकबाकीदार यांच्यावर कारवाया सुरू केल्या आहेत, असे उपायुक्त (मालमत्ता कर संकलन विभाग ) समीर भूमकर यांनी सांगितले आहे.
पालिकेकडून ८८१ मालमत्ता सील
मागील काही वर्षांपासून नोटिसा देऊनही मालमत्ताधारक करभरणा करण्यासाठी पुढे येत नाहीत. अशा थकबाकीदार मालमत्तांचे पालिकेने सर्वेक्षण पूर्ण केले आहे. जवळपास १७ हजार १२४ मालमत्ताधारकांची करवसुली थकीत राहिली आहे. त्यातील ७ हजार ९७८ इतक्या मालमत्तांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातील आतापर्यंत ८८१ इतक्या मालमत्ता सील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. कारवाई सुरू होताच काही मालमत्ताधारक करभरणा करण्यात पुढे येत असल्याने ७ कोटींचा कर वसूल झाला आहे. जी कारवाई जानेवारीपासून सुरू केली जात होती तीच कारवाई पालिकेने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांतच सुरू केली आहे. मार्चअखेरपर्यँत ही कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे, असे उपायुक्त समीर भूमकर यांनी सांगितले आहे.