प्रसेनजीत इंगळे
वसई, विरार शहराला महावितरण विभागाने पुरते हैराण करून सोडले आहे. अकार्यक्षम आणि जुनाट यंत्रणेमुळे शहरातील बत्ती गुल होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. रात्री-अपरात्री पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नागरिकांच्या संतापाचा पारा चढत आहे. वसई, विरार शहराच्या विकासात महावितरण विभाग खो घालण्याचे काम करत आहे. महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात वाढती देयके आणि अनियमित वीजपुरवठा नागरिकांच्या उद्रेकाला खतपाणी घालत आहेत.
वसई, विरारमध्ये मागील काही दिवसांपासून महावितरण विभागाने नागरिकांच्या नाकीनऊ आणले आहेत. छोटय़ा-मोठय़ा कारणावरून वारंवार वीजपुरवठा तासनतास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने वाढत चालले आहेत. त्यात वीज देयकांचा फुगीर आकार, ग्राहकांच्या खिशाला बसत असलेली कात्री आणि देयकांची जबरदस्तीने होणारी वसुली यामुळे या विभागाच्या मुजोर कारभाराला जनता वैतागली आहे. त्यात मागील २० वर्षांत कोटय़वधी रुपये कमावूनही महावितरणाने मागील नव्या सुविधा निर्माण न करता जुन्याच यंत्रणेवर आपला कारभार चालविला आहे. यामुळे वाढते ग्राहक आणि महावितरण संघर्ष वाढत चालला आहे.
वसई, विरारमध्ये लहानसहान कारणाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. आठवडय़ातील एकही दिवस असा जात नाही त्यात तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत नाही. जोराने वारा आला, पाउस पडला, पक्षी तारेवर बसून दुर्घटना झाली, पालिकेचे पाइपलाइन, रस्ते दुरुस्ती, अशा किरकोळ कारणानेसुद्धा तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक बत्ती, कृषी आणि इतर विद्युत ग्राहक मोठय़ा अडचणीत सापडले आहेत. केवळ वीजपुरवठा नियमित नसल्याने अनेक औद्योगिक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळत इतर शहरांत पलायन केले. त्यात छोटेमोठे व्यापारी आणि विजेवर अवलंबून असणारे अनेक धंदे बुडीत निघाले आहेत. तर घरगुती ग्राहकांना विजेची उपकरणे खराब होऊ नये म्हणून अतिरिक्त खर्च करून पर्यायी साधने लावावी लागतात. महावितरणच्या अनियमित वीजपुरवठय़ाने सामान्य नागरिकांना ४० ते ५० हजार रुपये खर्च करून इन्व्हर्टर बसून घ्यावे लागत आहेत. तर रुग्णालय आणि इतर नियमित आस्थापनांना केवळ विजेसाठी अतिरिक्त लाखो रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे हजारोची देयक भरूनही नागरिकांना विजेसाठी पदरमोड करावी लागत आहे. असे असतानाही महावितरण विभागाकडून कोणत्याही उपाययोजना आखल्या जात नाहीत. जरी शहराचा विकास वाढला असला तरी केवळ महावितरण विभागाच्या अकार्यक्षम यंत्रणेमुळे मागासलेपण वाढत चालले आहे.
वसई, विरार विभागातील वीजग्राहकांची संख्या सद्य:स्थितीत नऊ लाख ७२ इतकी झाली आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक, कृषी, पथदिवे, पाणीपुरवठा या ग्राहकांचा समावेश आहे. वसईच्या विभागाला साधारणपणे वर्षांला तीन हजारांहून अधिक मिलियन युनिट्स इतका वीजपुरवठा केला जात आहे. परंतु आता हळूहळू वीज ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ज्या उपकेंद्रातून या भागात वीजपुरवठा केला जात आहे, त्या यंत्रणेवरील विजेचा ताण वाढत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणे व इतर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.
भूमिगत वीज व्यवस्थेचे स्वप्न अधुरेच
वसई, विरारमध्ये मागील काही वर्षांपासून येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरण व्यवस्था कोलमडली जात आहे. मागील वर्षी आलेल्या मुसळधार पावसाने चार ते पाच दिवस संपूर्ण शहर अंधारात होते. अनेक वर्षांपासून भूमिगत वीजवाहक यंत्रणेची मागणी केली जात आहे. पण केवळ महावितरण व्यवस्थेकडून शासनाला वेगवेगळे प्रस्ताव सातत्याने पाठवले जातात आणि शासनाकडून या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली जाते. सन २०१७ मध्ये ९६ कोटी, सन २०१८ मध्ये १४० कोटी आणि २०२० मध्ये २९६ कोटींचे प्रस्ताव शासनाकडे महाविरणाने पाठविले आहेत. पण शासनाकडून याची कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे वसईकरांचे भूमिगत वीज व्यवस्थेचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता
शहरात तोकडय़ा यंत्रणेबरोबर कर्मचारी संख्यासुद्धा अपुरी आहे. यामुळे बिघाड झाल्यास कर्मचाऱ्यांना २४ तासांहून अधिक काम करावे लागत आहेत. तसेच कर्मचारी संख्या कमी आल्याने यंत्रणा राबविण्यातसुद्धा मोठय़ा अडचणी येत आहेत. बिघाड झाल्यास त्यातील दोष शोधणे आणि तो दुरुस्त करून यंत्रणा पूर्ववत करणे यासाठी मोठा कालावधी लागत आहे. शहरातील सर्वच महावितरण कार्यालयात मनुष्यबळाचा आभाव आहे. केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतके कर्मचारी लाखो लोकांचा विजेचा भार सांभाळत आहेत.
मीटरचा तुटवडा
मागील वर्षी वादळी वाऱ्यासह आलेल्या पुरात अनेक गृह संकुले पाण्यात गेली. यावेळी हजारो मीटर नादुरुस्त झाली. यातील अजूनही अनेक ठिकाणची मीटर अद्यापही लागले नाहीत. तसेच मीटरमध्ये बिघाड झाल्यास ती बदलून देण्यासाठी आजही कोणत्याही कार्यालयात मीटर नाहीत. अजूनही हजारो सदोष मीटर शहरात अस्तित्वात आहेत. त्यांचा फटका ग्राहकांना अतिरक्त वीज देयकाच्या रूपाने सहन करावा लागत आहे.
वसई, विरारमधून कोटय़वधी रुपये कमावत असताना महावितरण विभाग ग्राहकांना मूलभूत सेवा आणि अखंडित वीजपुरवठा करू शकत नाही. यामुळे शहरातील अनेक यंत्रणा केवळ विजेच्या अनुउपलब्धतेमुळे प्रगतीपासून वंचित राहत आहेत. लवकरच यावर तोडगा नाही निघाला तर ग्राहक आणि महावितरण संघर्ष शिगेला पोहचेल, अशी शक्यता वर्तविण्यात येते.
जुन्याच यंत्रणेवर वाढता ताण
वसई, विरार शहरात वाढती विजेची मागणी पाहता यंत्रणा वाढविणे गरजेचे असातानाही जुन्याच यंत्रणेचा कस काढला जात आहे. शहरातील जुन्या वीजवाहक तारा अद्यापही बदलेल्या गेलेल्या नाहीत. यामुळे वीज गळतीचे प्रमाण अधिक आहे. मर्यादित क्षमता असणाऱ्या रोहित्रावर वारेमाप वीजजोडणी दिली आहे. यामुळे ताण येऊन सातत्याने वीज खंडित होते. फीडर, डीपी बॉक्स असूनही दुरवस्थेत आहेत. त्यांची क्षमता नसतानाही अधिक जोडण्या केल्या जातात. बहुतांश डीपी (फीडर बॉक्स) अगदी रस्त्याच्या कडेला आहेत. त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी हे डबे पूर्णत: उघडे आहेत, यावर कोणतेही आवरण नाहीत, अनेक ठिकाणी वीजवाहक तारा बाहेर पडल्या आहेत. यामुळे पाण्याचा संपर्क झाल्यास अपघात होऊ शकतात. पावसाळय़ात अगोदर दुरुस्तीचे काम होणे गरजेचे होते, पण अजूनही दुरुस्तीची कामे झाली नाहीत. सध्या शहरात वीज वितरणासाठी लोखंडी खांब उभारून याचे वितरण सुरू आहे. या खांबावरील तारांचा अधिक भार झाल्याने अनेक ठिकाणच्या भागात विद्युत वाहक तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळत असलेल्या तारांचा अतिउच्च दाबाने किंवा हवेच्या वेगाने पावसाळय़ात तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन तारी तुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

Story img Loader