वसई: हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा वसई-विरारकरांनी रविवारी मोठ्या जल्लोषात साजरा केला.सुर्योदयानंतर घरोघरी नागरिकांनी गुढी उभारून मनोभावे पूजा करून गोड पदार्थांचा आस्वाद घेतला. पाडव्यानिमित्त शहरातील विविध सामाजिक संघटनांतर्फे सकाळी व सायंकाळी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शोभा यात्रा काढत मराठी नव वर्षाचे स्वागत केले.
वसईत नव वर्ष स्वागत समिती तर्फे मागील २८ वर्षापासून गुढीपाडव्या निमित्ताने शोभा यात्रा काढली जात आहे. यंदाही रमेदी दत्तमंदिर ते श्रीकृष्णेश्वर महादेव मंदिर वसई पारनाका अशी शोभा यात्रा काढण्यात आली होती.या शोभा यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी भव्य अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या या शोभायात्रेचे आकर्षण म्हणजे परिसरातील मुलांनी तयार केलेले लेझिम पथक – ढोलताशा पथकाचे वादन सादर करण्यात आले. यात युवक व युवती भगवे फेटे व पारंपरिक वेश भूषा परिधान करून व छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर चिमाजी आप्पा, तारा राणी, अशा विविध केलेल्या वेशभूषांनी यात्रेची शोभा वाढविली होती. या शोभा यात्रेत वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी सहभाग घेतला होता.
तर विरारच्या बोळींज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव प्रवीण राऊत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाडव्यानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती.यात ढोलताशाच्या वादनासहन मोठ्या संख्येने नागरिक महिला सहभागी होत मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले. श्री राम मंदिरात जाऊन पूजा अर्चा करून या यात्रेची सांगता करण्यात आली. निर्मळ येथे ग्रामस्थांनी गुढीपाडव्या निमित्ताने मिरवणूक काढली होती. यावर्षी साधू संताचे दर्शन घडावे यासाठी महाकुंभमेळ्यावर आधारित ही मिरवणूक ठेवण्यात आले होते. याशिवाय विविध देव देवतांच्या वेशभूषा सुद्धा मुलांनी साकारल्या होत्या. मागील १५ ते १६ वर्षांपासून ही मिरवणूक काढली जात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
“आमची वसई” तर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती. पंचवटी नाका ते वसई किल्ला अशी ही शोभायात्रा होती. या शोभ यात्रेची वसई पश्चिमेच्या साई नगर येथे भव्य अशी शोभायात्रा निघाली होती. या पारंपारिक वेशभूषेत महिलांनी सहभाग घेतला. लेझीम नृत्य, एकोप्याची गुढी उभारत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर नायगाव पूर्वेच्या जूचंद्र परिसरात युवा प्रतिष्ठान तर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीविठ्ठलनाथ संस्थान विरार यांच्या तर्फे सायंकाळी शोभायात्रा पार पडली. यावेळी विविध मर्दानी खेळ , पारंपारीक वेशभूषा, रिल्स स्पर्धा घेण्यात आली. उमेळे , कामण, पोमण, विरार, नालासोपारा, नवघर वसई अशा विविध ठिकाणी गुढीपाडव्याच्या मिरवणुका काढत नवीन वर्षाचे स्वागत करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाहन खरेदी, सोने, नवीन गृहपयोगी वस्तू यासह इतर वस्तू खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी गर्दी केली होती.
चैत्र नव वर्षानिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी
गुढीपाडव्याच्या निमित्ताने वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.विशेषतः विरार येथील जीवदानी माता मंदिर, सोनूबाई भवानी माता मंदिर, मीरा भाईंदर येथील धारावी देवी मंदिर, नायगाव जूचंद्र येथील चंडिका देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.चंडिका देवी मंदिरात पाडव्या निमित्ताने विविध प्रकारच्या फळांची आरस करून सजावट करण्यात आली होती.