वसई विरार शहरात रस्ते नूतनीकरण, काँक्रिटीकरण, जलवाहिन्या अंथरणे, पुलांची उभारणी, गटार बांधणी यासह विविध प्रकारची विकास कामे हाती घेतली जात आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ती कामे अगदी महत्त्वपूर्ण आहेत. असे जरी असले तरीही ती कामे मार्गी लावत असताना नागरी सुरक्षेच्या अनुषंगाने कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. याचाच फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे.
वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरात विकास कामे ही अगदी जोरात सुरू झाली आहेत.शहरातील नागरिकांना रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी यासह इतर सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग प्राधिकरण अशा विविध प्रशासकीय स्तरावरून विकासाची कामे सुरू करण्यात आली आहेत. विशेषतः कोणतेही काम करताना शहरातील नागरिकांना त्याचा कोणताही त्रास होणार नाही, त्यातून प्रदूषण निर्माण होणार नाही, सुरक्षा सूचना फलक, पर्यायी रस्त्यांची व्यवस्था अशा विविध उपाययोजना प्रामुख्याने आखायला हव्यात.
शहरात वर्षानुवर्षे अशी विकास कामे चालतात परंतु त्या दरम्यान कोणत्याची प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने अपघाताच्या सारख्या घटनांना सामोरे जावे लागते. सद्यस्थितीत वसई विरार महापालिकेला एमएमआरडीएच्या ४०३ दशलक्षलीटर सुर्या प्रकल्प योजनेतून १८५ दशलक्षलीटर पाणी मिळाले आहे. त्यामुळे वसई विरार भागात जलवाहिन्या टाकण्याचे कामांना वेग आला आहे. सुरवातीला महामार्ग तसेच मुख्य जलवाहिन्या टाकण्याची कामे पालिकेने पूर्ण केली होती. आता शहरांतर्गत जलवाहिन्या ही टाकल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला खोदकाम करून या वाहिन्या अंथरल्या जात आहेत. मात्र खोदकाम केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. अनेक ठिकाणी काम सुरू असल्याचे सूचना फलक ही दिसून येत नाहीत. रस्ते खणले असल्याने त्या ठिकाणी ये जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
रस्त्यावरील काम पूर्ण करून झाल्यानंतर लगेचच त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. तसे होत नसल्याने काम पूर्ण होऊन पंधरा ते वीस दिवस उलटून गेले तरी त्या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही.या अशा प्रकारच्या निष्काळजीपणाचा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.तर दुसरीकडे पूरस्थिती समस्या सुटावी यासाठी मधूबन गोखीवरे येथील रस्त्यांची उंची वाढविली जात आहे. मात्र त्या कामा दरम्यान नागरिकांना ये जा करताना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे होते. आजही या रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड प्रमाणात धूळ उडते या धुळीने नागरिकांचा कोंडमारा होत आहेत.
तसेच नायगाव पूर्वेतील जूचंद्र परिसरात असलेल्या एल सी क्रमांक ९ या रेल्वे फाटकावर होणारी वाहतूक कोंडी सुटावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जूचंद्र रेल्वे फाटाकावर १ हजार ३८६ मीटर लांबीचा उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू आहे.मात्र पुलाचे काम करताना ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने त्याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. पुलासाठी कॉलम उभारणी करण्यात येत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने ये जा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
मात्र पर्यायी रस्ते ओबडधोबड पद्धतीने तयार केले जात आहेत. काही ठिकाणी रस्त्याची उंच सखल स्थिती आहे.
त्यामुळे अरुंद रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीमुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या ही निर्माण होऊ लागली आहे.काही ठिकाणी धुळीचे ही मोठ्या प्रमाणात साम्राज्य तयार झाले आहे.त्यामुळे संपूर्ण रस्ता हा प्रदूषणमय बनला असल्याचे चित्र आहे.अशा धुळीने भरलेल्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. तर शाळकरी विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत.तरी सुद्धा अजूनही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.प्रदूषण होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासन म्हणून पालिकेने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मात्र त्यांचे दुर्लक्ष झाल्याने अडचणी वाढत आहेत.
तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ते काम जरी अंतिम टप्प्यात आले असले तरीही विविध ठिकाणी कामाचे नियोजन नसल्याचे चित्र दिसून येत आहे. डांबरी रस्त्यावरच काँक्रिटचा थर चढविला गेला त्यामुळे आता रस्ता हा उंच झाला परंतू वर्सोवा पासून विरार फाटा या दरम्यान रस्त्याच्या कडेला माती टाकून पिचिंग करणे गरजेचे होते ते न झाल्याने गाड्यांना उतार मार्ग शोधावा लागत आहे. काहीवेळा वाहने त्यावरून खाली येऊन अपघात ही घडत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती पालिकेच्या गटार कामांची सुद्धा आहे. गटारांची कामे करताना खोदकामे केली जातात. ते काम नियोजित वेळेत होत तर नाहीच परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी सुद्धा घेतली जात नाही. नुकताच नालासोपारा पूर्वेच्या विवांता हॉटेल जवळच्या भागात मलनिस्सारण वाहिनी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
मलनिस्सारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे. जवळपास दहा ते बारा फूट इतका खोल खड्डा खणला जात आहे. मात्र त्या ठिकाणी जे मजुर काम करतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नसल्याने ढिगारा अंगावर कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला होता. शहरात अशा प्रकारच्या अपघाती घटना घडूनही प्रशासन कोणताच बोध घेत नाही. शहराचा विकास साधत असताना सर्वसामान्य नागरिकांचे हित आधी लक्षात घेतले पाहिजे.मात्र केवळ ठेकेदाराला फायदा म्हणून न पाहता नागरी सुरक्षेला प्राधान्य मिळालायला हवे तसे होत नसल्याने आज ठिकाणची विकास कामे निष्काळजीपणे सुरू आहेत. अशा प्रकारे प्रत्येक कामात प्रशासनाची अनास्था राहिली तर एक दिवस याची मोठी किंमत मोजावी लागेल.