वसई – वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वसई विरार शहरात ४ रेल्वे उड्डाणपूल बनविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. निवडणुकीच्या घोषणांमध्ये या ४ रेल्वे उड्डाणपूलांचा मुद्द्याचा जोरदार प्रचार करण्यात आला होता. मात्र निवडणूका संपताच केवळ २ रेल्वे उड्डाणपूलांवर वसईकरांची बोळवण करण्यात आली आहे. त्यानुसार आता नालासोपारा मधील अलकापुरी आणि ओस्वाल नगरी या दोन उड्डाणपूलांनाच रेल्वेने मंजुरी दिली आहे तर विरार नगर आणि उमेळमान येथील उड्डाणपूलांना नकार दिला आहे.

वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील रस्ते अरूंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते. त्यासाठी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याची संकल्पना समोर आली होती. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने शहरात ४ रेल्वे उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये उमेळमान (वसई), ओस्वालनगरी (नालासोपारा) अलकापुरी (नालासोपारा) आणि विराट नगर (विरार) या चार उड्डाणपूलांचा समावेश होता. या ४ पूलांच्या निर्मितीसाठी १५५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. एमएमआरडीएने या रेल्वे उड्डाणपूलाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर पालिकेने त्यासंदर्भातील सर्वेक्षण आणि आराखडे पालिकेने सादर केले होते. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या रेल्वे उड्डाणपूलांचा मुद्दा प्रचारात आणण्यात आला होता.

प्रत्यक्षात मिळणार २ पूल

वसई विरार मध्ये सत्तांतर झाले आणि प्रत्यक्षात कामाची वेळ आली तेव्हा रेल्वेने घूमजाव केले आहे. या ४ उड्डाणपूलांच्या कामांच्या पाठपुराव्यासाठी पालघरचे खासदार डॉ हेमंत सवरा यांनी रेल्वे मंत्री अश्वीन वैष्णव यांची भेट घेतली. तेव्हा ४ पुलांना मंजुरी देता येणार नाही. केवळ अलकापुरी आणि ओस्वाल नगरी या दोन पुलांनाच मंजुरी देत असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. त्यापैकी अलकापुरी आणि ओस्तवाल नगरी येथील रेल्वे उड्डाण पुलाची जिओ-टेक्निकल तपासणी पूर्ण झाली असून,रेल्वे मार्गदर्शक तत्त्वांनुसार सामान्य व्यवस्था रेखाटन तयार करण्यात आले आहे. मी देखील ४ रेल्वे उड्डाणपूलांसाठी प्रयत्नशील होतो. परंतु सध्या २ उड्डाणपूल मिळणार आहेत. उर्वरित २ पुलांसाठी पाठपुरावा केला जाईल असे खासदार हेमंत सवरा यांनी सांगितले.

हे २ पूल मिळणार

१) अलकापूरी- (वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान)

२) ओस्वाल नगरी- (विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान)

हे २ पूल मिळणार नाही

१) विराट नगर- ( विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान)

२) उमेळमान- (वसई आणि नायगाव रेल्वे स्थानका दरम्यान)

Story img Loader