वसई: वसई विरार शहराचे झपाट्याने होणारे नागरीकरण याचा फटका आता शेतीला बसू लागला आहे. या वाढत्या बांधकामामुळे शेतीचे लागवडीखालील क्षेत्र कमी होऊन त्यात घट होऊ लागली आहे. वसईत ७ हजार ८९१ हेक्टर क्षेत्र लागवडीचे असून यावर्षी केवळ ६ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असून जवळ ११०० हेक्टरने लागवड क्षेत्रात घट झाली आहे. मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण वेगाने वाढत आहे. असे जरी असले तरीही विविध ठिकाणच्या भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. यात विशेषतः भाजीपाला लागवड, भातशेती, फुलशेती, फळबागा अशी शेती केली जात असून त्यावरच अनेक शेतकरी कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

आता वाढत्या नागरीकरणामुळे भातशेतीच्या लागवड क्षेत्रातच विकासकामे वाढली आहे. तसेच दुष्काळ, अवकाळी पाऊस,  पिकांवर होणार रोगाचा प्रादुर्भाव  , पिकणाऱ्या शेत जमीनीला लागूनच होणारी  प्रचंड भरावाची  विकास कामे , मोकाट गुरे , मजुरांची टंचाई , श्रमाच्या मानाने मिळणारे तुटपुंजे उत्पन्न आणि त्यात वाढती महागाई अशा विविध कारणांमुळे शेतकरी भात शेती लागवड करीत नाहीत. त्यामुळे लागवड क्षेत्र घटू लागले आहे.अनेक ठिकाणी शेती क्षेत्राच्या चारही बाजूने भराव झाल्याने शेतात पाणी साचून राहत असल्याने शेतीच करता येत नाही.तर दुसरीकडे काही ठिकाणी कचरा, खाड्यातील दूषित पाणी भात शेतीत येत असल्याने प्रदूषण निर्माण होऊन शेती ही नापीक बनू लागली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.अशा विविध कारणामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे ही सोडून दिले आहे.

वसई विरार सुरवातीला शहरात नऊ हजा हेक्टराहून अधिक शेती लागवड क्षेत्र होते.हळूहळू क्षेत्र कमी होऊ सद्यस्थितीत  ७ हजार ८९१ हेक्टर क्षेत्र लागवडीचे क्षेत्र उरले आहे. त्यापैकी  ६ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात येत आहे. अन्य उर्वरित ११०० हेक्टरने लागवड क्षेत्र पडीत राहत असल्याची माहिती वसई तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवा, आधुनिक तंत्रज्ञान वापर करून शेती करणे, पीक विमा, जास्तीत जास्त उत्पादन कसे निघेल अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करवून शेती क्षेत्र टिकविण्याचा शेत जमिनींची विक्री  वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमिनीचे भाव ही वाढले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी जागा विकून पैसे मिळवत आहेत. तर दुसरीकडे काही सतत शेतीत नुकसान सहन करावे लागत असल्याने नोकरी धंद्यात उतरले आहेत.त्यामुळे शेतीचे क्षेत्र पडीत राहू लागले आहे.तसेच महागाईमुळे शेती करणेही परवडत नसल्याने अनेक शेतकरी आपल्या जमिनी निवासी संकुले, कारखाने, हॉटेल्स, रिसॉर्ट यासाठी विकत आहेत. काही जण भागीदारी मध्ये गुंतवणूक करीत आहेत.

विकास प्रकल्पांचा फटका 

वसई विरार शहरातून बुलेट ट्रेन, विरार अलिबाग कॉरिडॉर, यासह विविध प्रकारचे प्रकल्प जात आहेत. यासह शहरातील विविध विकास प्रकल्प यामुळे धूळ प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्याचा रब्बी पिकाला ही फटका बसला आहे. त्यामुळे रब्बी पिकांची लागवड केली होती ती धूळ प्रदूषणामुळे धोक्यात सापडली असल्याचे वसई पूर्वेतील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना आताच्या काळात शेती करणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी यांत्रिक पध्दतीने शेती करावी याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन शिबीरे घेतली जातात. व नाविन्यपूर्ण काही करता येईल का यावर ही शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाते.- उमाकांत हातांगळे, कृषीअधिकारी वसई तालुका