वसई विरार शहरातील तलाव, बावखल यासह इतर नैसर्गिक जलस्त्रोत आता हळूहळू नष्ट होऊ लागले आहेत. जवळपास ७० टक्के बावखल ही प्रदूषित केली व बुजविली आहेत. तर दुसरीकडे नैसर्गिक तलाव ही प्रदूषित झाले आहेत. यामुळे हळूहळू नैसर्गिक जलस्त्रोत कमी होऊन भविष्यात पाणी टंचाई सारख्या सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

वसई विरारचा परिसर म्हणजे हिरवागार निसर्ग, फळबागा, विस्तीर्ण समुद्रकिनारा, डोंगररांगा, बावखले, सुंदर तलाव असे चित्र समोर येते. निसर्गाच्या या सौंदर्य समृद्धीने शहराला हरित वसई अशी ओळख दिली आहे. मात्र मागील काही वर्षात शहरात वाढती विकासकामे , नव्याने तयार होत असलेले प्रकल्प, बुजविण्यात येत असलेले जलस्त्रोत, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र टिकविण्यासाठी होत असलेले दुर्लक्ष, चटई निर्देशांक क्षेत्रात करण्यात आलेली वाढ,  वाढते प्रदूषण, अतिक्रमण, बेसुमार वाळू उपसा, पाणी जाण्याचे नैसर्गिक बंद झालेले मार्ग, अशा विविध मार्गाने पर्यावरणाला हानी पोहचविण्याचे काम सुरू आहे. बदलत्या काळाच्या ओघात गावांचे शहरात रूपांतर होऊ लागले आहे. रुपांतर होत असताना पर्यावरणीय दृष्टीने कोणताच विचार होत नसल्याने आज वसईत विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहे. विशेषतः आता येथील नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट होण्याचा धोका पाणी अभ्यासक तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

शहरात विविध नैसर्गिक जलस्त्रोत संवर्धन करण्याकडे प्रशासनाची उदासीनता असल्याने पाण्याची पातळी खालावली जात आहे. वसईच्या पश्चिम पट्ट्यात बावखले तर पूर्व भागात तळी व विहिरी  हे नैसर्गिक जलस्रोत टिकवणारे व भूगर्भातील पाण्याची पातळी समतोल राखण्यास मदत होत होती. त्यामुळे वसईत अनेक वर्षांपासून बावखले वसई पश्चिम परिसरातील पाण्याची गरज भागवत आहेत. शहरात नुकताच एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात वसईत आठशेहून अधिक सार्वजनिक व खासगी बावखले आहेत.मात्र यातील ७० टक्के बावखले ही अतिक्रमण, माती भराव, कचरा टाकून बुजविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तर दुसरीकडे शहरात स्पार्क ( सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ एरिया रिसोर्स सेंटर) या संस्थेच्या सदस्यांनी शहरातील तलावांची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. यात त्यांनी १८४ ठिकाणची असलेल्या तलावांचे सर्वेक्षण केले यात त्यांनी केलेल्या अभ्यासात १२८ तलाव हे प्रदूषित असल्याचे निष्पन्न झाले होते.

तसेच पाण्यासाठी बोअरवेल मारल्या जातात. सुरवातीला बोअरवेल मध्ये अवघ्या काही फूट अंतरावर पाणी उपलब्ध होत होते. आता तीनशे ते चारशेफूट खोली गाठूनही पाणी लागत नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असल्याने ही समस्या निर्माण होत आहे. अशी विविध उदाहरणातूनच शहरातील नैसर्गिक जलस्त्रोत कसे उध्वस्त केले जात आहे याचा अंदाज येत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते व पाणी अभ्यासक मागील काही वर्षांपासून नैसर्गिक जलस्त्रोत टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांना ही प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांची कोंडी होत असते. अनेकदा बावखल बुजविण्याचे प्रकार घडत असतात. त्याला विरोध ही करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याचे प्रकार घडतात.

बावखलाला प्रशासकीय स्तरावरून जलस्त्रोत म्हणून मान्यता नसल्याने अशा अडचणी येतात. बावखल हे पावसाचे पडणारे पाणी साचवून त्याचे पुनर्भरण करणे, जैवविविधता टिकून ठेवणे, पूरस्थिती नियंत्रण ,भूगर्भातील पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे या सर्व दृष्टीने ही नैसर्गिक जलस्त्रोत टिकविणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. परंतु प्रशासकीय स्तरांवरून जलस्त्रोत संवर्धनाला अपेक्षित सहकार्य मिळायला हवे. तर नागरिकांनी ही काही नैसर्गिक बाबींचा स्वीकार करून ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तरच जलस्त्रोत नष्ट होण्याचे संकट वेळीच थोपवता येईल.

नैसर्गिक जलस्रोतावर ही लक्ष हवे

वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या भागात पाण्याची मागणी ही वाढू लागली आहे. सध्या स्थितीत शहराला पेल्हार, सुर्या अशा विविध धरणातून सुमारे प्रतिदिन ३८० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो. मात्र भविष्यात शहराची लोकसंख्या पुढील २० वर्षात ४५ ते ५० लाखांच्या घरात जाणार आहे. त्यानुसार नियोजन करण्याच्या दृष्टीने पालिकेने खोलसापाडा, देहर्जी प्रकल्प अशी विविध धरणांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. असे जरी असले तरी जे नैसर्गिक जलस्त्रोत आहेत ते संवर्धन करण्यासाठी कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आजही पूर्व व पश्चिम भागातील तळी , विहिरी ही मानवांसह प्राण्यांची, पशु पक्षांची तहान भागविण्याचे काम करीत आहेत. जे शहरातील नैसर्गिक जलस्त्रोत आहेत ते टिकवणे व त्यांचे संवर्धन करण्यावर ही भर द्यायला हवा.

जलस्रोतांचा बळी

वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. काँक्रिटकरणा वाढत्या जंगलामुळे येथील भूजल पातळी खालावत असल्याने विविध ठिकाणच्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असते. जलस्रोत टिकवण्यासाठी तलाव व बावखळ यांचे संवर्धन होणे गरजेचे बनले आहे. महापालिकेने शहरात तलाव विकसित केली आहेत ती सिमेंट काँक्रिटीकरणाचा वापर करून केली असल्याने एकप्रकारे सुशोभिकरणाच्या नावाखाली तलावांचा बळी दिला जात आहे असल्याचा आरोप केला जात असतो.तलाव विकसित करताना ते नैसर्गिक पद्धत वापरून व जैवविविधतेला हानी न पोहचता कसे करता येईल याचा ही विचार होणे गरजेचे बनले आहे.