वसई : विरार मधील व्यापारी मोबीन शेख याच्यावर गोळीबार करणार्या ३ आरोपींना विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मस्तान शेख या आरोपीने एक लाखांची सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणला होता. विरारच्या गोपचर पाडा येथे राहणार्या मोबीन शेख (४२) या व्यापाऱ्यावर १५ जानेवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्यात तो थोडक्यात बचावला होता. पत्नीशी प्रेमसंबंध तसेच व्यावसायिक वाद असल्याने चाळ बिल्डर मस्तान शेख याने हा हल्ला घडवून आणला होता. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने प्रत्यक्ष गोळी झाडणारा मोहीत ठाकूर याला मुंबईतून अटक केली तर त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.
हत्येची सुपारी देणारा मस्तान शेख, त्याचा साथीदार अजय सिंग या दोघांना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली होती. मोबीन शेख याची हत्या करण्यासाठी आरोपी मस्तान याने १ लाखांची सुपारी दिली होती. त्यासाठी अजय सिंग याने उत्तरप्रदेशातून दोन तरुणांना बोलावले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक अभिजित मडके (गुन्हे) गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे तसेच सचिन लोखंडे, संदीप जाधव, हर्षद चव्हाण, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदीप शेरमाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा : आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक फरार, हवालदाराला १५ लाखांची लाच घेताना अटक
दुसर्यांदा हल्ल्याचा प्रयत्न फसला
मस्तान शेख याला आपल्या पत्नीसोबत व्यापारी मोबीन शेख याचे संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे १० जुलै २०२३ रोजी देखील मस्तान शेखने ४ लाखांची सुपारी देऊन मोबीन याच्यावर ॲसिड हल्ला केला होता. मात्र, त्यातून तो बचावला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटताच त्याने दुसर्यांदा हल्ला घडवून आणला होता. पंरतु तो फसला, असे पोलिसांनी सांगितले.