वसई: मयंक ज्वेलर्सवरील दरोड्याची उकल पोलिसांनी केली असली तरी सराफ मालकाने पोलिसांच्या तपासावरच संशय व्यक्त केला आहे. साडेनऊशे ग्रॅम सोन्याची चोरी झाली असताना पोलिसांनी फक्त ३०० ग्रॅम सोने परत मिळवले मग उर्वरित ६०० ग्रॅम कुठे गेले? असा सवाल सराफ मालकाने केला आहे. चोरांनी सोने वितळवले मात्र त्यात २० टक्के घट होत नसल्याचे सांगून त्यावरही संशय व्यक्त केला आहे. माणिकपूर पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
१० जानेवारी २०२५ रोजी वसईच्या मंयक ज्वेलर्स या दुकानावर दरोडा पडला होता. चोरांनी दुकानाचे मालक महेंद्रसिंह संघवी यांना मारहाण करून दुकानातील सोने लुटून नेले होते. या दरोड्यात एकूण ९५० ग्रॅम सोने लुटण्यात आले होते अशी तक्रार फिर्यीद संघवी यांनी दिली होती. माणिकपूर आणि वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने याप्रकरणी तपास करून ५ जणांच्या टोळीला अटक केली होती. या आरोपींनी ४७ तोळे सोने चोरल्याची कबुली दिली होती. ते सोने वितळवून कर्नाटक येथील ३ सोनारांना विकले होते. पोलिसांनी ते सोने हस्तगत केले आहे. मात्र ९५० ग्रॅम म्हणजे ९५ तोळे सोने चोरीला गेले असताना केवळ २९३ ग्रॅम सोने परत मिळवले आहे तर मग उर्वरित ६०० ग्रॅम सोने कुठे गेले असा सवाल मालक संघवी यांनी केला आहे. ४७ तोेळे सोने वितळवून २९ तोळे झाले असे पोलिसांनी सांगितले. त्याला देखील हरकत घेण्यात आली आहे. सोने वितळविल्यावर घट २ ते ५ टक्के होते. २० टक्के घट होतच नाही असा दावा त्यांनी केला. याप्रकरणी आठवड्याभरात जर आमचे सोने परत मिळवले नाही तर वसईतील सराफांच्या संघटनेमार्फत आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पोलिसांनी आरोप फेटाळले
माणिकपूर पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. तक्रारदारांनी अतिरिक्त जबाब देण्यासाठी ५ दिवस लावले. त्यानंतर ९५० ग्रॅम सोने गेल्याचा दावा केला. मात्र ते त्याचा हिशोब देऊ शकले नाहीत. तक्रारदारांच्या जबाबातच विसंगती आहे. आम्ही आरोपींची कसून चौकशी केली आणि ४७ तोळे हस्तगत केले आहे. आमच्या सर्व वरिष्ठांनी सर्व बारकावे, तपशील सखोल तपासले आहे, त्यामुळे तक्रारदारांच्या दाव्यात काही अर्थ नाही असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितले. जर पोलिसांवर विश्वास नसेल तर सीआयडी कडे किंवा न्यायालायात दाद मागावी असेही ते म्हणाले. तक्रारदाराने साडेतीन कोटींचा विमा काढला होता. मात्र चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाल्याने या विम्याची रक्कम मिळणार नाही, म्हणून हा कांगावा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.