वसई विरार मधून कामासाठी ट्रेनने मुंबईला गेलेला प्रवासी संध्याकाळी घरी परतेल का याची शाश्वती नसते. हे विधान धाडसी किंवा अतिशयोक्तीचे वाटू शकेल. मात्र लोकल ट्रेन संबंधीत वाढते अपघात पाहता हे सत्य स्विकारावं लागतं. २०२४ या वर्षातील अपघात आणि त्यात मृत्यू होणार्‍या प्रवाशांची संख्या ही चिंताजनक आहे. या अपघातात सर्वात गंभीर आहे ते म्हणजे गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून होणारे प्रवाशांचे मृत्यू. वसई विरार मधील ही वाढत्या गर्दीचा हा परिणाम आहे. त्यामुळे भविष्यातही हा धोका अधिक वाढत जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार हे वाढत्या लोकसंख्येचे शहर आहे. १९६१ साली वसई तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४१ हजार एवढी होती. ती सातत्याने वाढत गेली. पालिकेच्या नोंदीनुसार शहरातील सध्याची लोकसंख्या ही २५ लाखांच्या घरात आहे. शहरातील बेसुमार अनधिकृत बांधकामे, मुंबईलगत असल्याने विकसित होणार्‍या वसाहती, मुंबईच्या तुलनेत स्वस्तात मिळणारी घरे त्यामुळे दररोज शहरात हजारो लोकं नव्याने रहायला येत असतात. ही या लोकसंख्या वाढीची मुख्य कारणे. या गर्दीचे भीषण परिणाम विविध क्षेत्रात पहायला मिळतात. नागरी सोयीसुविधांवर ताण तर पडतोच, परंतु अनधिकृत रिक्षा, रस्त्यावरील फेरिवाले यात वाढ होत असते. त्यांच्याकडून होणारी अतिक्रमणे, बकालपणा यामुळे शहर बकाल होत असून राहणीमानाचा दर्जा खालावला आहे. नागरिकांना दैनंदिन जीवन त्रासाचे होऊ लागले आहे. मोकळा रस्ता आता वसई विरार मध्ये दूर्मीळ होऊ लागला आहे. या भरमसाठ लोकसंख्येचा सर्वाधिक फटका बसला आहे तो म्हणजे लोकल ट्रेन्सला. वसई विरार मधून मुंबईला जाण्याचा जवळचा आणि वेळ वाचविणारा किफायतशीर मार्ग म्हणजे लोकल ट्रेन. परंतु लोकसंख्या वाढल्याने लोकल ट्रेनवर प्रचंड ताण येऊ लागला आहे. त्यामुळे अक्षरश: लोकल ट्रेनमध्ये कोंबून प्रवास करावा लागतो. त्याचा सगळ्यात मोठा धोका असतो तो खचाखच भरलेल्या गर्दीच्या ट्रेन मधून खाली पडण्याचा.

२०२४ या वर्षात ववसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० प्रवाशांचा तर पालघरच्या हद्दीत २३ जणांचा ट्रेनमधून खाली पडून मृत्यू झाला होता. तर १२८ प्रवाशांचा रुळ ओलांडताना मृत्यू झाला होता. वसई रेल्वेच्या हद्दीत मिरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा या रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. येथे वर्षाला ५० प्रवासी फक्त ट्रेनमधून पडून मरण पावतात. म्हणजे महिन्याला ४ तर आठवड्याला एका प्रवाशाचा मृत्यू होत असतो. ही अत्यंत गंभीर बाब आहे. रेल्वे मधून पडून मरण पावणारे प्रवासी हे नोकरीसाठी मुंबईला कामाला जाणारे कष्टकरी, कामगार, शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी असतात. कुटुंबातील कमावते असतात, कुटुंबाचा आधार असतात. वेळेवर कार्यालयात पोहोचायचे असते. गर्दीच्या ट्रेन्स तरी किती सोडणार? कारण येणारी प्रत्येक ट्रेन ही तेवढ्यात गर्दीची असते. त्यामुळे नाईलाजाने ट्रेनमध्ये कसरत करून चढावं लागतं. आतही एवढी गर्दी असते की जीव गुदरमतो, शरीर आक्रसून जातं. बोरीवली पर्यंत प्रत्येत स्थानकात गर्दी वाढत जाते. त्यामुळे आठवड्याल किमान एक प्रवासी ट्रेन मधून खाली पडून मरण पावत असतो.

९० च्या दशकात वसई विरार शहरात बांधकाम व्यवसाय फोफावू लागला आणि लोकसंख्या वाढू लागली. पुर्वी विरार ते बोरीवली दरम्यान केवळ दोन मार्गिका होती. एक चर्चगेटला जाणारी आणि दुसरी चर्चगेटवरून विरारला येणारी. त्यामुळे लोकल ट्रेनची संख्या मर्यादीत होती. तेव्हा देखील खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रवास केला जात होता. प्रवासी लोकल ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करायचे. विरार-बोरीवली दरम्यान चौपदरीकरणासाठी आंदोलने झाली. अखेर २००४ मध्ये चौपदीरकरण झाले. नंतर हळूहळू ट्रेन्सची संख्या वाढविण्यात आली. परंतु दिलासा मिळाला नाही कारण त्या मानाने लोकसंख्या देखील वाढत होती. त्यामुळे कितीही रेल्वे गाड्या वाढवल्या, नवीन मार्गिका टाकल्या तरी ट्रेनची गर्दी काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. कारण तेच वाढती लोकसंख्या.

अशी वाढली लोकसंख्या

१९६१ मध्ये वसईची लोकसंंख्या १ लाख ४१ हजार एवढी होती. १९७१ मध्ये ती १ लाख ७१ हजार एवढी झाली. १९८१ मध्ये २ लाख ५६ हजार, १९९१ मध्ये ४ लाख ५ हजार तर २००१ मध्ये ६ लाख ८८ हजार झाली. पुढे २०११ मध्ये १३ लाख आणि २०२१ नुसार १८ लाख ७५ हजार एवढी झाली.

दोन स्थानके, सहावी मार्गिका आवश्यक

दररोज लाखो लोक वसई विरार मधून मुंबईला प्रवास करत आहेत. मुंबईला जाण्यासाठी लोकल ट्रेन हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात मोठी गर्दी उसळत असते. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला फलाटावर पाय ठेवायला देखील जागा नसते. पुढील काही वर्षात ही परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे. त्यामुळे विरार आणि नालासोपारा तसेच नालासोपारा आणि वसई मध्ये प्रत्येकी एक नवीन रेल्वे स्थानक तसेच सहावी मार्गिका तयार करण्याची गरज आहे. वसई आणि नालासोपारा मधील अलकापुरी येथे तसेच विरारच्या पुढे नवीन रेल्वे स्थानक तयार करता येऊ शकेल. सहावी मार्गिका झाली तर हार्बर आणि इतर ठिकाणी जाता येईल. भाईंदर खाडीवरील मागील २२ वर्षांपासून प्रस्तावित असलेला पूल तयार केल्यास रस्ते वाहतूक करता येईल आणि रेल्वेचा ताण काही प्रमाणात कमी होईल. सध्या मेट्रो दूरच आहे पण तो पर्याय देखील उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. हे झाले पर्याय. परंतु वसई विरारच्या मधील अनधिकृत बांधकामे थांबली तर लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल. नोकरी, धंदे, शिक्षणासाठी वसई विरार मधून मुंबईला जात असतात. हेच उद्योग, नोकर्‍या शैक्षणिक संस्था, रुग्णालये वसईत उभारली तरी मुंबईला जाणार्‍या गर्दी कमी होऊ शकेल.