वसई : वसई विरार महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना अगदी सुलभ पणे मिळावा यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनांचा लाभ मिळवता येणार आहे.वसई विरार महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने गरीब व गरजूंना विविध योजना मंजूर केल्या आहेत. अनाथ निराश्रीत मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना प्रोत्साहानात्मक अनुदान, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता महिलेच्या मुलीच्या विवाहासाठी व शैक्षणिक अनुदान, महिलांना डायलेसीस उपचार अर्थसहाय्य, एकाकी ज्येष्ठ निराधार वय वर्ष ६० वरील महिलांच्या उपजीविकेसाठी अनुदान, कुष्ठरोग बाधीत कुटूंबाला अनुदान, अनाथ व निराधार मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य, ज्या महिलेचे पती व्याधीग्रस्त असून अंथरुणास खिळलेले आहेत अशा महिलांच्या मुलांना तसेच अनाथ निराश्रीत बालकांना शैक्षणिक अर्थसहाय्य दिले जाते. तसेच कोवीड-१९ मध्ये आई किंवा वडील मयत झालेल्या पालकांच्या मुले व मुलींना शैक्षणिक अर्थसहाय्य दिले जाते.

कर्करोग ग्रस्त महिलेस उपचारासाठी अर्थसहाय्य, १८ ते २१ वयोगटातील अनाथ मुला व मुलींना उपजिविकेकरिता अर्थसहाय्य देणे,एच आयव्ही एड्स बाधीत पालकांच्या मुलांना शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य, महिलांना मेमोग्राफी व पॅप स्मीअर चाचणी करण्याकरिता अर्थसहाय्य, निराधार मुलींना विवाह सोहळयासाठी अर्थसहाय्य अशा विविध योजनांतून लाभ दिला जातो.यापूर्वी या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना पालिकेच्या कार्यालयात जावे लागत होते. यात त्यांचा वेळही वाया जात होता.

विशेषतः अर्ज सादर केल्या नंतर त्याच्या चौकशीसाठी सुद्धा फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता या लाभार्थ्यांना घरबसल्या या योजनांचा लाभ मिळावा व त्यांची पालिका कार्यालयात ये जा करताना येणारी फरफट थांबावी यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरुन अर्ज करता येणार असून, पारदर्शक व जलद प्रक्रिया यामुळे अधिकाधिक महिलांना योजनांचा लाभ मिळविता येणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

असा मिळणार लाभ

ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांसाठी https://mahilabalkalyan.rtsvvmc.in संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर जाऊन कोणत्या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे यासाठी अर्ज सादर करावा व आवश्यक कागदपत्रे मागितली जातील त्यांची पूर्तता करावी. ऑनलाइन प्रणालीचा वापर करून पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे असे आवाहन पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.