वसई: वसई विरार महापालिकेने दिव्यांग नागरिकासाठी विविध योजना जाहिर केल्या आहेत. त्यात ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्यांना मासिक अनुदान, ज्येष्ठांना नागरिक आणि खेळाडूंना अनुदान, व्यवसायासाठी अनुदान, गतिमंत मुलांच्या पालकांना संगोपनासाठी अनुदान आदी विविध योजनांचा समावेश आहे. या सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी सर्व योजना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत महानगरपालिका हद्यीतील दिव्यांगकरिता विविध कल्याणकारी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अपंगत्व असलेल्या अंध, अस्थिव्यंग, बहुविकलांग, कर्णबधिर-मुकबधीर दिव्यांग व्यक्तींना मासिक अनुदान जाहीर करण्यात आले आहेत. त्यात  ४० % ते ५९% अंपगत्व (मासिक १ हजार) ६० % ते ७९ % अपंगत्व (मासिक १५०० रुपये) ८० % ते १०० % अपंगत्व (मासिक २ हजार)  रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

याशिवाय जेष्ठ ६० वर्षावरील दिव्यागांना कायमस्वरुपी प्रोत्साहनात्मक प्रतीमाह २ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल. दिव्यांगांनी स्वयंरोजगार करून स्वावलंबी बनावे यासाठी व्यवसायानुसार ५० हजारांपर्यंत आधार योजना लागू करण्यात आली आहे.  १८ वर्षावरील गतीमंद व मतीमंद व्यक्तीच्या संगोपनाकरिता त्यांच्या कुटूंबाला प्रतीमाह २ हजार अनुदान दिले जाणार आहे. दिव्यांग खेळाडूंसाठी तालुकास्तरीय १० हजार जिल्हास्तरीय २५ हजार राज्यस्तरीय ५० हजार आणि  आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना १ लाख इतके प्रोत्साहनात्मक अनुदान  दिले जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींना व्याधीग्रस्त आजार, शस्त्रक्रिया त्या अनुषंगीक आजारानुसार खर्चाच्या २५% अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

योजना ऑनलाईन

या सर्व योजनांची महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दैनंदिन अंमलबजावणी सुरू असून, याबाबतचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://vvcmc.in/schemes-2/ या संकेतस्थळावर भेट द्यावे. तसेच खालील दिलेल्या QR code वर स्कॅन करुन देखील अर्ज करु शकतात. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसाच्या कृती आराखडयातील ७ कलमी उपक्रमा अंतर्गत वसई-विरार क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांना महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ऑनलाईन पद्धतीने मिळणेकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी सदर योजनेकरिता पात्र महानगरपालिका हद्यीतील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त अनिल कुमार पवार  यांनी केले आहे.

हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी

केंद्र शासन आणि राज्य शासन दरवर्षी दिव्यांगांसाठी, नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते. परंतु या योजनेपासून अनेक दिव्यांग आणि नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहेत तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेतील प्रत्येक कार्यालयामध्ये दिव्यांगांना आणि वृद्ध नागरिकांना आपल्या शासकीय कामकाजाकरिता महापालिका कार्यालयात जाण्यासाठी लिफ्टची सोय नसल्याकारणाने त्यांना कार्यालयातील जिणे चढ-उतार करावे लागत आहेत।  हे जिने चढ-उतार करताना काही दिव्यांग आणि वृद्ध नागरिक या जिन्यावरून पडून त्यांना दुखापत सुद्धा झाली आहे.

महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना दिव्यांगांच्या वृद्ध नागरिकांच्या समस्येबाबत संपर्क केला असता. कधी कधी अधिकारी कॉल उचलत नाहीत. लिफ्ट नसल्याकारणाने अनेक मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने दिव्यांगांसाठी आणि वृद्ध नागरिकांसाठी महापालिका कार्यालयामध्ये हेल्पलाइन सेवा सुरू करण्याची मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी आपले पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.