वसई: जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने वसई विरार महापालिकेने नागरिकांना अनोखी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने विविध विषयांवरील १० लाखांची नवी पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. त्यात मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे.
वसई-विरार शहरात एकूण १८ वाचनालये आहेत. त्यापैकी नवघर माणिकपूर, वसई पारनाका, तुळींज आणि विरार येथे पालिकेची चार वाचनालये आहेत. उर्वरित १४ ग्रंथालये ही खासगी संस्थांची आहेत. पालिकेच्या वाचनालयात ६५ हजारांहून अधिक पुस्तके आहेत. नागरिकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पालिकेने आपल्या ग्रंथसंपदेत भर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० लाखांची पुस्तके विकत घेतली जाणार आहेत. ही पुस्तके मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतील आहेत. या पुस्तकांमध्ये कथा, कादंबऱ्या, चरित्रे आदी विविध साहित्य प्रकाराबरोबर स्पर्धा पुस्तकांचाही समावेश आहे. पालिकेने अभ्यासिकेची वेळदेखील सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत वाढवली आहे.
नागरिकांचे वाचनविश्व समृद्ध करण्यासाठी आम्ही नवनवीन पुस्तके विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. वाचकांना सर्व प्रकारचे दर्जेदार साहित्य वाचता यावे या दृष्टिकोनातून या पुस्तकांची खरेदी केली आहे, असे पालिकेचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा