वसई- वसई विरार महापालिकेने ३४ आयुष्यमान आरोग्य मंदीर बांधून पुर्ण केली आहे. नुकतेच वसईच्या गिरीज आणि विरारच्या कसराळी येथे दोन आयुष्यमान आरोग्य मंदीराचे उद्घाटन करण्यात आले.

राज्य शासनाने वसई विरार महापालिकेला ५५ आयुष्यमान आरोग्य मंदिर बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी पालिकेने ३४ केंद्र तयार केली आहे. वसईच्या गिरीज येथेली  टोकपाडा  येथील आयुष्यमान आरोग्य मंदीराचे उद्घाटन आमदार स्नेहा दुबे पंडीत यांच्या हस्ते तर विरारच्या कसराळी येथील आयुष्यमान आरोग्य मंदीरांचे उद्घाटन आमदार राजन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.  या लोकार्पण कार्यक्रमावेळी मान्यवर नागरिक,उपायुक्त समीर भुमकर,महानगरपालिका अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी,सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध २ ठिकाणी महानगरपालकेमार्फत आयुष्यमान आरोग्य मंदीर नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुरु करण्यात आले आहेत. यासोबत आतापर्यंत एकूण ३४ आयुष्यमान आरोग्य मंदीर कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित २१ आरोग्य मंदिरे लवकरच पूर्ण केली जातील, असे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.

या आरोग्य केंद्रातून बाह्य रुग्ण विभाग सेवा, दीर्घकालीन संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगाची तपासणी व प्रतिबंध उपाययोजना, एच.बी. (हिमोग्लोबिन), मलेरिया चाचणी (बि.एस. एम.पी.)युरिन प्रेगनन्सी रॅपिड टेस्ट, मधुमेह तपासणी, डेंग्यू चाचणी, लसीकरण अशा सुविधा नागरिकांना दिल्या जातील अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. या आरोग्य केंद्रामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

Story img Loader