वसई: वसई विरार शहरात दिवसागणिक भटक्या श्वानांचा उपद्रव वाढू लागला आहे. या भटक्या श्वानांचा नियंत्रणात आणण्यासाठी नवघर येथे पालिकेचे एकमेव निर्बीजीकरण केंद्र आहे. मात्र दुरूस्तीच्या कामामुळे मागील काही दिवसांपासून हे केंद्र बंद आहे. वसई विरार शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढू लागली आहे. सैरावैरा फिरणारे भटके श्वान नागरिक व लहान मुले यांच्यावर हल्ला चढवत असल्याच्या घटना समोर येत असतात. तर कधी कधी नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडतात. यासाठी या श्वानांना आवर घालावा अशी मागणी सातत्याने नागरिकांमधून केली जात आहे.
सध्या स्थितीत पालिकेचे नवघर पूर्वेच्या भागात एकमेव श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. त्याची क्षमता केवळ १६५ इतकी आहे. या केंद्रात श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून हे केंद्र बंद अवस्थेत आहे. त्यामुळे श्वानांच्या निर्बिजीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. या केंद्रातील श्वान ठेवण्याचे पिंजरे व फरशी तुटली आहे. त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे हे केंद्र काही दिवस बंद ठेवण्यात आले असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
नवीन केंद्र ही रखडली
नवघर पूर्वेच्या भागात पालिकेचे एकमेव निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यात १६५ इतकेच श्वानांवर उपचार केले जाऊ शकतात. वाढत्या श्वानांच्या उपद्रवामुळे ते ही अपुरे पडू लागले आहे. यासाठी पालिकेने नवीन निर्बीजीकरण केंद्रासाठी चंदनसार व नालासोपारा येथील निर्मळ येथे निश्चित केले होते. मात्र विविध प्रकारच्या अडचणीमुळे ते ही काम रखडले.याशिवाय त्यानंतर खाली इमारती ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उपचार सुरू करू असे ठरविले होते त्यावरही तोडगा निघाला नसल्याने समस्या जटिल बनू लागली आहे.
नवघर येथील निर्बीजीकरण केंद्राची दुरुस्तीसाठी ते बंद आहे. लवकरच ते सुरू होईल. तसेच विरार पूर्वेच्या भागात ही नवीन केंद्र सुरू करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
नानासाहेब कामठे, उपायुक्त ( घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक आरोग्य)
हेही वाचा : सत्ताबदलाचे पडसाद मॅरेथॉनवर; पिवळ्या रंगा ऐवजी भाजपच्या झेंड्याचे रंग
भटक्या श्वानांना आवर घाला
वसई विरार मध्ये सातत्याने दंशाच्या घटना घडत आहेत. श्वान दंशाच्या घटनांमुळे पुन्हा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.सध्या या भटक्या श्वानांना खाण्यासाठी काही मिळत नसल्याने विविध भागातूनही श्वान हळूहळू एका भागातून दुसऱ्या भागात येत आहेत. याशिवाय त्यांचा उपद्रव ही वाढू लागला आहे.या भटक्या श्वानांवर पालिकेने नियंत्रण मिळवावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.