वसई विरार : महापालिकेच्या दोन ठेका अभियंत्याची पब मधील भूमाफियांसोबत मेजवानी आणि तरुणींसोबत केलेले अश्लील नृत्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या प्रकरणाची चित्रफित व्हायरल होताच पालिकेने तडकाफडकी दोघांना बडतर्फ केले आहे. पालिकेची प्रतिमा मलिन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु पालिकेची प्रतिमा एरवी देखील ढिसाळ कारभार आणि भ्रष्टाचारामुळे मलीन होते असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१७ मध्ये वसई विरार महाालिकेतील ठेका अभियंत्यांची वाढदिवस पार्टी चांगली गाजली होती. ठेका अभियंता स्वरूप खानोलकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने मेजवानीचे आयोजन केले होते. खानोलकर हे ठेका अभियंता असले तरी त्यांचा चांगला दबदबा होता. त्यांची ख्याती सर्वत्र होती. त्यांच्या पार्टीत सर्व ठेका अभियंते होते. त्यांनी या मेजवानीत धम्माल नृत्य केले होते. अर्थात मेजवानी म्हटले की पेयपान आलेच आणि ते घेतल्यानंतरचे नृत्य म्हणजे कसलेच बंधन नव्हते. फिल्मी गाण्याच्या चालीवर ठेका धरत हे नृत्य केले होते. काही दिवसांनी या नृत्याची चित्रफित व्हायरल झाली. तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी याप्रकरणी १२ ठेका अभियंत्यांना बडतर्फ केले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता पुन्हा पालिका अभियंत्याची पब मधील मेजवानी आणि नृत्याची एक चित्रफित व्हायरल झाली आणि पालिका कर्मचार्‍यांच्या वर्तनाचा प्रश्न समोर आला आहे.

हेही वाचा : पालिका अभियंत्यांचे पब मधील नृत्य प्रकरण : ३ तरुणींची तक्रार, विनयभंगाचा गुन्हा दाखल

पालिकेच्या चंदनसार (सी) प्रभागातील अभियंता मिलिंद शिरसाट आणि पेल्हार (एफ) प्रभागातील अभियंता भीम रेड्डी हे दोन अभियंते आपल्या मैत्रीणीसमेवत वसईतील ‘पंखा फास्ट’ नावाच्या एका पब मध्ये नृत्य करत होते. तो त्यांच्या खासगी जीवनातील भाग होता. परंतु त्यांच्यासोबत भूमाफिया होते आणि या भूमाफियांनी ही पार्टी आयोजित केल्याचा दावा केला जात आहे. हे दोन्ही अभियंते अतिक्रमण विभागात कार्यरत होते.

अतिक्रमणांविरोधात कारवाई करणे त्यांच्याकडून अपेक्षित होते. परंतु अशा कारवाया करण्याऐवजी अतिक्रमण करणार्‍यांबरोबरच ते मेजवानी करत होते. त्यामुळे पालिका अधिकारी चांगलेच संतप्त झाले. ही चित्रफित व्हायरल होताच अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी तडकाफडकी दोघा ठेका अभियंत्यांची पालिकेतून हकालपट्टी केली. पालिकेची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. कामाच्या वेळेनंतर खासगी आयुष्य कुणी जगत असेल तर तो त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु महापालिकेत काम करत असताना खासगी जीवनात वावरताना देखील नैतिक बंधने पाळायला हवी असतात याचे भान या अभियंत्यांना नव्हते. कारण ते कुणा नातेवाईकाच्या लग्नात नाचत नव्हते तर ते पार्टीत तरुणींसोबत नृत्य करत होते आणि त्यांच्या सोबत अतिक्रमण कारवाई कऱणारे भूमाफिया होते. त्यामुळे या अभियंत्यांनी कितीही सारवासारव केली असली तरी जे दिसलं ते स्पष्ट आणि उघड होतं. शासकीय संस्थेत काम करताना, जबाबदारीच्या पदावर काम करत असताना कुणासोबत वावरतो याचं भान बाळगायला हवं. त्यामुळे पालिकेने केलेल्या कारवाईला चुकीचं ठरवता येणार नाही. या ठेका अभियंत्यांचे प्रताप जगजाहिर आहेत. त्यांचा जेवढा पगार असतो त्याच्यापेक्षा जास्त वेतन त्या अभियंत्यांचे चालक घेत असतात. या अभियंत्यांनी जमवलेल्या माया आणि कारनाम्यांच्या दंतकथा सतत चर्चेत असतात. त्यामुळे ते निरपराध, निर्दोष, निरागस समजण्याचे कारण नाही.

हेही वाचा : वसई भाईंदर रोरो सेवेच्या रस्त्याला पुरातत्व खात्याचा खो, वर्दळीमुळे ऐतिहासिक वसई किल्ल्याला धोका असल्याची तक्रार

पालिकेने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून आपली तत्परता दाखवली आहे. पण ही तत्परता अन्य बाबतीत का नसते? चित्रफित व्हायरल होण्याच्या जेमतेम आठवड्याआधी पेल्हार परिसरात एक दुर्घटना घडली. अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून एक मजूर ठार झाला होता. पोलिसांनी ठेकेदार आणि बिल्डरवर गुन्हा दाखल केला. पण अशा अनधिकृत बांधकांमांना आश्रय देणारे अभियंते, पालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असतानाही ती केली नाही. अनधिकृत बांधकामामुळे एक मजूर मेल्याने पालिकेची प्रतिमा मलिन झाली नाही का? की फक्त अभियंत्यांनी नृत्य केल्याने प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे या कारवाई मध्ये मागे पालिका अधिकार्‍यांचा देखील दुटप्पीपणा दिसून येतो. पालिकेच्या प्रतिमा मलिन होण्याच्या अनेक घटना आहेत.

मागील वर्षी २०२३ मध्ये पालिकेत कर घोटाळा उघडकीस आला होता. नागरिकांनी भरलेले कराचे पैसे परस्पर खासगी वापरासाठी वळविण्यात येत होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर अधीक्षक, सहाय्यक आयुक्ताचे निलंबन केले. पण चौकशी करून सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना निर्दोष ठरवून पुन्हा सेवेत घेण्यात आले. मात्र कर अधीक्षक अरूण जानी याच्यावर अद्याप गुन्हा दाखल केला नाही. अशा वेळी गुन्हा दाखल करण्याची तत्परता अद्याप पालिकेने दाखवलेली नाही. या घोटाळ्यामुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाली नव्हती का?

हेही वाचा : वहिनीची हत्या करणार्‍या दिराला जन्मठेप; वसई सत्र न्यायालयाचा निकाल

पालिकेच्या सदोष कामांमुळे नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागतो. नागरिकांची गैरसोय होते. पावसाळ्यात शहर जलमय होते. तेव्हा मात्र नागरिकांची गैरसोय झाली म्हणून कुणावर कारवाई होत नाही, की कुणी अधिकारी राजीनामा देत नाही अशा वेळी पालिकेची प्रतिमा मलिन होत नाही का?.

मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सार्वजनिक ठिकाणी ढिसाळ कारभार केल्याप्रकरणी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह इतर अधिकार्‍यांना धारेवर धरले. आयुक्तांना तर थेट मुख्यालयात येऊन फटकावेन अशी भाषा वापरली. तेव्हा पालिकेला आपली प्रतिमा मलिन झाल्यासारखे वाटले नाही. तेव्हा तक्रार तर सोडा या घटनेबाबत साधा ब्र देखील उच्चारला गेला नव्हता.

पालिका कर्मचारी अधिकार्‍यांनी सार्वजनिक जीवनात जबाबदारीने वर्तन करायला हवे अन्यथा प्रतिमा मलीन होते, हे मान्य. ठेका कर्मचार्‍यांना त्याची शिक्षा मिळाली आहे. पण हाच नियम पालिकेला इतर बाबतीतही लागू होतो. सार्वजनिक हिताची, नागरिकांची कामे जबाबदारीने करायला हवी. तेव्हा देखील प्रतिमा मलिन होत असते हे लक्षात ठेवायला हवे. तेव्हा देखील अशाच प्रकारे तत्परतेने कारवाई अपेक्षित आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipal corporation engineers dancing with a girl in pub suspended defamation of municipal corporation css