वसई: वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  यात हवेत उडणारे धुळीकण शोषून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाच फॉग कॅनन यांत्रिक वाहने खरेदी केली आहेत. येत्या आठवडा भरातच ती वाहने धूळ नियंत्रणासाठी रस्त्यावर उतरवली जाणार आहेत.

वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढू लागले आहे. रस्त्यावरील वाढती वाहतूक व विविध ठिकाणी सुरू असलेले बांधकामांचे प्रकल्प यामुळे शहरात प्रदूषण वाढू लागले आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेकडून आता प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

हेही वाचा >>>वसईत मद्यपी तरुणाचा प्रताप,पोलिसांनी अडवताच दुचाकी पेटवली

राष्ट्रीय हवा शुद्धीकरण उपक्रमाच्या अंतर्गत पालिकेच्या कार्यक्षेत्रात प्रदूषण कमी करण्यासाठी एकापाठोपाठ एक अशा उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.हवेत धुळीकणांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता पाच फॉग कॅनन वाहने खरेदी करण्यात आली आहे. यासाठी ३ कोटी २० लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.

या यंत्रणेच्या माध्यमातून हवेतील धुळीकण नियंत्रण केले जाणार असून पाण्याच्या अतिसुक्ष्म थेंबांची फवारणी करून हवेतील धुलीकण नियंत्रण केले जाणार आहे.यासाठी या यंत्रामध्ये १० हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. त्यात पाणी साठवून सूक्ष्म आकाराच्या नोझल्समधून पाण्याची फवारणी वर्दळीचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, अंतर्गत रस्ते अशा ठिकाणी करून हवेतील नियंत्रण केली जाणार आहे.तर दुसरीकडे वाढत्या धुळीने दुभाजक , दुभाजकांच्या मध्ये लावण्यात आलेली झाडे ही धुळीने भरून जातात. त्याची या फॉग कॅनन यंत्राच्या द्वारे स्वच्छता करता येणार आहे.अशा प्रकारच्या यंत्रणेमुळे शहरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>>आई मला घरी घेऊन चल… विरहाच्या वेदनेने अनाथाश्रमातील चिमुकल्याची आत्महत्या

प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपक्रम 

वसई विरार शहरातील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी मागील दोन शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ  हवा कार्यक्रमांतर्गत  (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम) या उपक्रमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात वृक्ष लागवड करणे, घनदाट जंगलासाठी मियावाकी वने विकसित करणे, गॅस दहिन्या असलेल्या स्मशानभूमी, ६ ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्रणा,  सहा ठिकाणी हवा हवा शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.शहरातील रस्ते सफाईसाठी सात झाडू यांत्रिक वाहने खरेदी करून या यंत्राद्वारे मुख्य रस्ते, रस्त्याच्या कडा अशा ठिकाणी स्प्रिंकल द्वारे पाणी शिंपडून रस्त्याची स्वच्छता केली जात आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाकडून ई बस सेवा सुरू केली आहे. असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने फॉग कॅनन वाहने घेण्यात आली आहेत. या वाहनांद्वारे हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या आठवडाभरात ही वाहने सेवेत आणली जातील.- नानासाहेब कामठे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन ) महापालिका