वसई :  कर्मचाऱ्यांच्या निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांनाच कामे देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठेकेदारांना काळय़ा यादीत टाकून संपूर्ण ठेका प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

घनकचरा ठेकेदार दिनेश संख्ये, श्रीमती तबस्सुम ए मेमन, झाकीर के मेमन, रवी चव्हाण यांच्यावर शासनाचा कर बुडवून कर्मचाऱ्यांची, महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यासंबंधी विरार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हादेखील दाखल आहे. असे असूनसुद्धा महापालिकेने संबंधित ठेकेदारांना ठेका संपल्यावरसुद्धा मुदतवाढ दिलेली होती.  अशा ठेकेदारांना काळय़ा यादीत टाकून संपूर्ण ठेक्यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली आहे. संबंधित ठेकेदारांना महापालिकेचा कोणताही ठेका देण्यात येऊ नये. असे झाल्यास शिवसेना  जनहितार्थ मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अ‍ॅड. अनिल चव्हाण यांनी दिला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर या ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतली होती.  सहा महिने स्थगिती मिळाली होती. मात्र आता दोन वर्षे उलटूनही या ठेकेदारांना कामे दिली जात आहेत, असा आरोप भाजपचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे.

घोटाळा काय?

महापालिकेच्या स्थापनेआधीपासून हे विशिष्ट ठेकेदार विविध कामांचा ठेका घेत होते. हे ठेकेदार पालिकेला वकील, अभियंते, डॉक्टर, आरोग्य व अग्निशमन कर्मचारी, संगणकचालक, लिपिक, मजूर, सुरक्षारक्षक, मजूर, वाहनचालक इत्यादी पुरवत होते. या ठेकेदारांकडे ३ हजार २६५ हून अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. हे ठेकेदार कंत्राटी कामगारांना पूर्ण पगार न देता उर्वरित रक्कम स्वत:च्या खिशात घालत होते.  जुलै २००९ पासून फेब्रुवारी २०१८ पर्यंत हे सर्व ठेकेदार महापालिकेत ठेका पद्धतीने कर्मचारी पुरवठा करण्याचे काम करत होते. या ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांचे ९२ कोटी २७ लाख रुपये हडप केल्याचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या ठेकेदारांनी शासनाचीही फसवणूक केली आहे. शासनाची मोठय़ा प्रमाणात करचोरी करून ठेकेदारांनी कोटय़वधी रुपयांची लूट केली आहे. या ठेकेदारांनी शासनाचा सेवा कर, व्यवसाय कर भरला नाही. या ठेकेदारांनी शासनाच्या सेवा आणि व्यवसाय कराचे तब्बल २९ कोटी ५१ लाख रुपये बुडवल्याचा आरोप आहे.

Story img Loader