वसई- वसई विरार महापालिकेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नागरिकांसाठी ११ आरोग्य केंद्र सेवेत आणली आहेत. त्यामध्ये ३ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि ८ आरोग्य वर्धिनी केंद्रांचा समावेश आहे. राज्य शासनाने दिलेल्या १५ पैकी १४ आपला दवाखाना पालिकेने तयार केला असून उर्वरित दवाखान्याचे उद्दीष्ट या महिन्यात पू्ण केली जाणार आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिकांना ४७७ आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आणि १४१ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्यापैकी वसई विरार महापालिकेला ६५ आरोग्य वर्धिनी केंद्र (आयुष्यमान आरोग्य मंदिर)  आणि १५ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असे एकूण ८० आरोग्य केंद्र उभारण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहेत. कमी वेळेत ही आरोग्य केंद्रे उभारण्याचे उद्दीष्ट पालिकेपुढे होते. त्यासाठी जागा शोधणे, केंद्र उभारणे, आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करणे अशा विविध स्तरावर पालिकेचे प्रयत्न सुरू होते. विविध अडचणींवर मात करत पालिकेने मार्च अखेर पर्यंत १० ‘आरोग्यवर्धिनी केंंद्र’ आणि ११ ‘आपला दवाखाना’ सुरू केले होते. उर्वरित आरोग्य केंद्रांसाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू होते. त्यासाठी पालिकेने जागा शोधून ही केंद्रे तयार केली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आणखी ११ आरोग्य केंद्रे नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये ३ आपला दवाखाना आणि ८ आरोग्यवर्धिनी केंद्राचा (आयुष्यमना आरोग्य मंदिर)  समावेश आहे. यासाठी पालिकेने जागांचा शोध घेतला असून कंटनेर उभारून ही आरोग्यकेंद्रे सुरू करण्यात येत आहेत.

हेही वाचा >>>वसई : बहुचर्चित जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भूमिपूजन, १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे मंत्र्यांचे आदेश

या ठिकाणी सुरू झाली ११ आरोग्य केंद्रे

आपला दवाखाना

१) धानीव तलाव- नालासोपारा

२) नारिंगी गाव, विरार

३) भोयदापाडा, वालीव नाका, वसई

आयुष्यमान आरोग्य मंदीर (आरोग्यवर्धीनी केंद्रे)

१) बरफपाडा, विरार

२) मोहक सिटी, विरार

३) गोकुळ टाऊनशीप, विरार

४) नंदाखाल, विरार

५) वटार, विरार

६) छेडानगर, नालासोपारा

७) म्हाडा कॉलनी, श्रीप्रस्थ नालासोपारा

८) नाना नानी पार्क, समर्थ नगर विरार

१५ पैकी १४ आपला दवाखाना सुरू

वसई विरार महापालिकेला १५ आपला दवाखान्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते त्यापैकी  १) कोपरी चंदनसार २) वसई इंडस्ट्रीयल इस्टेट, नवघर ३) परेरानगर, नायगाव ४) मनवेलपाडा ५) कुंभारपाडा ६) माणिकपूर ७) सिध्दार्थ नगर ८) आनंद नगर ९) सुयोग नगर १०) चक्रेश्वर तलाव ११) बापाणे नाका या ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. गुरूवारी आणखी ३ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. उर्वरित एक आपला दवाखाना पुढील काही दिवसात तयार होणार असून आपला दवाखान्याचे उद्दीष्ट पूर्ण केल जाईल, असे पालिकेचे उपायुक्त समीर भूमकर यांनी सांगितले. उर्वरित आरोग्यवर्धिनी केंद्रे देखील लवकरच उभारण्यात येणार आहे.

आपला दवाखाना

हा आपला दवाखाना राज्य शासनाच्या अनुदानातून सुरू करण्यात येत आहे. या दवाखान्यांमधून ३० प्रकारच्या चाचण्या करण्यात येतात. प्रत्येक दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची नियुक्ती असते. दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी असेल.

आरोग्यवर्धीनी केंद्रे

केंद्र शासनाने मधुमेह, रक्तदाब या सारख्या दिर्घकालीन असंसर्गजन्य रोगांवर उपचार करण्यासाठी आरोग्यवर्धीनी केंद्राची संकल्पना मांडली आहे. या आरोग्य केंद्रात नियमित आजारांच्या तपासणीसाठी बाह्य रुग्ण विभाग सेवा तसेच दीर्घकालीन संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगाची तपासणी व प्रतिबंध उपाययोजना, एच.बी. (हिमोग्लोबिन), मलेरीया चाचणी (बि.एस. एम.पी.)युरिन प्रेगनन्सी रॅपिड टेस्ट, मधुमेह तपासणी, डेंग्यू चाचणी, लसीकरण अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये एक डॉक्टर, एक अधिपरिचारिका (जेएनेएम), १ बहुउद्देशिय कर्मचारी (एमपीडब्ल्यू) आणि एक सहाय्यक आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत या आरोग्य केंद्रात नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात येतात.