वसई: अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेकडून आढावा घेतला जात आहे. शहरात ५० इमारती या अतिधोकादायक असल्याचे आढळून आले असून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागांत अजूनही अनेक वर्षे जुन्या असलेल्या इमारती आहेत. त्यात आजही अनेक ठिकाणी नागरिक राहत आहेत. परंतु जसजशी वर्षे उलटून जात आहेत त्यातील काही इमारती जीर्ण होत असल्याने धोकादायक बनू लागल्या आहेत. काही वेळा अशा धोकादायक असलेल्या इमारती कोसळून दुर्घटना होत असतात. नुकतीच नालासोपारा पूर्वेच्या तुळींज परिसरातील साई निवास या एकमजली चाळीचा भाग कोसळल्याची घटना घडली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पालिकेने शहरात प्रभागनिहाय सर्वेक्षण करून धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यात पालिकेच्या कार्यक्षेत्रात ५० इमारती या अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या अतिधोकादायक असलेल्या इमारतींना पालिकेकडून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत व त्यांना टप्प्याटप्प्याने तोडण्याचे कामही पालिकेकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी रहिवासी राहत आहेत. तर यातील जवळपास २२ प्रकरणे ही न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.
२७४ अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त
वसई विरार शहरात अतिधोकादायक असलेल्या इमारती या सी १ वर्गात येत असून या तातडीने जमीनदोस्त करणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने पालिकेने अतिधोकादायक इमारतींची यादी काढून त्या खाली करून टप्प्याटप्प्याने पाडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २७४ अतिधोकादायक इमारती तोडल्या असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.