वसई : वसई विरार महापालिकेने सांडपाणी प्रकल्पासाठी दिवाणमान येथील शंभर फुट रस्त्याजवळ नवीन आरक्षण प्रस्तावित केले आहे. या ठिकाणी असलेले महापालिका वाहनतळाचे तसेच पाणी योजनेसाठी लागणारे तोलण तलावाचे (एमबीआर) आरक्षण रद्द करण्यात आले आहे. हा प्रकल्प ४७ दशलक्ष लिटर्सचा असून त्याची अंदाजित किंमत ४०० कोटी एवढी आहे.

वसई विरार शहरातील सांडपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहरातून दररोज १५६.२८ दशलक्ष लिटर्स एवढे सांडपाणी निर्माण होत असते. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते खाडीत आणि समु्द्रात सोडणे आवश्यक असते. सध्या विरारच्या बोळींज येथे एकच सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित आहे. पालिकेने शहरातील एकूण ७ निवासी क्षेत्रामध्ये (झोन) सांडपाणी प्रकल्प (एसटीपी) प्रस्तावित केले आहे. त्यात नालासोपारा मध्ये २, नवघर माणिकपूर येथे २ आणि वसईत १ सांडपाणी प्रकल्पांचा समावेश आहे. नुकताच नालासोपारा पूर्वेला ४३१ कोटी रुपयांच्या दुसर्‍या सांडपाणी प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

नवघर माणिकपूरचा प्रकल्प दिवाणमान मध्ये

वसई विरार महापालिकेने नवघर माणिकपूर शहरासाठी (झोन ६) सांडपाणी प्रकल्प मौजे दिवाणमान येथील भूमापन क्रमांक १७६ या जागेमध्ये प्रस्तावित केला आहे. यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये शासन राजपत्रात प्रस्ताव सादर केला आहे. दिवाणमान येथील शंभर फुटी रस्त्याजवळ असेलल्या टेम्पो स्टॅंडच्या मागील जागेत हा प्रकल्प उभा राहणार आहे. या ठिकाणी महापालिकेच्या वाहनांसाठी वाहनतळ तसेच पाणी पुरवठ्यासाठई तोलण तलाव (एमबीआर) जागा आरक्षीत केली होती. मात्र सांडपाणी प्रकल्पासाठी या हे आरक्षण हटविण्यात आले आहे.

असा आहे नवघर माणिकपूरचा सांडपाणी प्रकल्प

या प्रकल्पासाठी ३५ हजार ३३ चौरस मीटर जागा आरक्षित करण्यात आली आहे. या सांडपाणी प्रकल्पाची क्षमता प्रतिदीन ४८ दशलक्ष लिटर्स एवढी आहे. नवघर माणिकपूर शहरातील सांडपाणी या प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते खाडीत सोडले जाणार आहे. याप्रकल्पाची एकूण खर्च ४०० कोटी एवढा आहे. या प्रकल्पांच्या उभारणीतील सर्व तांंत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी केंद्राकडून २५ टक्के आणि राज्याकडून ४५ टक्के निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. उर्वरित ३० टक्के निधी महापालिका देणार आहे,

नगररचना विभागाला सांडपाणी प्रकल्पासाठी जागा आरक्षित करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आम्ही आरक्षणात फेरबदल केले आहेत. सांडपाणी प्रकल्प राबविणे आमच्या अखत्यारीत नाही.वाय एस रेड्डी संचालक नगररचना विभाग ( वसई विरार महापालिका)