वसई- वसई विरार महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल ३९२ कोटींची मालमत्ता कराची वसुली केली आहे. आजवरची ही सर्वाधिक वसुली आहे. नवीन सर्वेक्षणानुसार आढळून आलेल्या वाढीव मालमत्तेमुळे पालिकेला १११ कोटींची अतिरिक्त महसूल मिळाला आहे. मालमत्ता कराची वसुली अधिक करण्यासाठी पालिकेने १२ हजार मालमत्ता जप्त केल्या आहेत.

वसई विरार महापालिका हद्दीत १० लाख ८ हजार २२ एवढ्या मालमत्ता आहेत. त्यात  छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती, उपहारगृहे, इमारती, सदनिका आदींचा समावेश आहे. वित्तीय वर्ष १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ रोजी पर्यत मालमत्ता कराचे ३९२ कोटी ५५ लाख  इतकी वसुली केली आहे. त्यात ३८४.५५ कोटी रोखीने तर ८ कोटी रूपयांचे धनादेश जमा झाले. पालिकेच्या १५ वर्षांच्या इतिहासातील ही आजवरची सर्वाधिक विक्रमी वसुली असल्याचे उपायुक्त (कर) समीर भूमकर यांनी सांगितले. पालिकेने २०२२-२३ मध्ये ३७१ कोटींची विक्रमी कराची वसुली केली होती.

नवीन मालममत्तांमुळे १११ कोटींची वाढ

मालमत्ता कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेने नव्या मालमत्ता शोधण्यासाठी जीआयएस प्रणाली द्वारे सर्वेक्षण सुरू केले होते.  या सर्वेक्षणात  मालमत्तेची डिजिटल स्वरूपातील छायाचित्रे  जिओ-टॅगिंग, अंतर्गत व बाह्य मोजमाप आणि त्यांचे कार्पेट, बांधकाम क्षेत्र डिजिटल उपकरणाद्वारे मोजमाप करण्यात आले होते. या सर्वेक्षणात २५ हजार ५१५ मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. त्यात ३० लाख चौरस फुटांचे वाढीव बांधकाम आढळून आले होते. त्यातून २०२४-०२५ मध्ये नविन २२ हजार ६७१ निवासी आणि ११ हजार २९९  वाणिज्य मालमत्ता आढळल्या होत्या. या नव्या मालमत्तांवरील करातून माहापालिकेला १११ कोटी ५२ लाखांचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे.

१२ हजार मालमत्ता केल्या सील

काही मालमत्ता धारक वर्षानुवर्षे कर भरणा करण्यासाठी पुढे येत नसल्याने मोठ्या प्रमाणात कराची रक्कम थकीत रहात होती. कराची रक्कम थकीत ठेवणाऱ्या मालमत्ता धारकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२८ व अनुसूची ‘ड’ प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये थकबाकी दारांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिले होते. त्यानुसार ८ हजारांहून अधिक मालमत्ता धारकांना पालिकेच्या कर संकलन विभागाने जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. या मालमत्ता धारकांनी २४ कोटींचा कर थकीत ठेवला होता. नोटिशी नंतर ही काही मालमत्ता धारक पुढे येत नसल्याने या मालमत्तांना सील बंद करून त्या जप्त करण्यास सुरुवात केली होती. ज्या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरणा केलेला नाही अशा १२ हजार १०४ मालमत्ता सील केलेल्या आहेत. या जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करून त्यातून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती कर संकलन विभागाने दिली आहे.

मागील ३ वर्षातील वसुली

२०२२-२०२३ ३७१.२६ कोटी

२०२३-२०२४ ३४६.४१ कोटी

२०२४-२०२५ ३९२.५५ कोटी