वसई- सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून महापालिकेने सामाजिक दायित्व निधीच्या मदतीने कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. तरुणांसाठी अशा प्रकारे उपक्रम राबवणारी ही राज्याची पहिली महानगरपालिका असल्याचा दावा केला जात आहे. या केंद्राच्या माध्यमातून मोफत विविध व्यावसायिक कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणार्थींना भविष्यात नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

भाईंदर पूर्व येथील अप्पा साहेब धर्माधिकारी सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर हे केंद्र उभारण्यात आले आहे. कोटक महेंद्रा व टेक महेंद्रा या दोन व्यावसायिक संस्थाच्या सामाजिक दायित्व निधीतूनही केंद्र चालवले जाणार आहे. यासाठी महापालिकेला कोणताही खर्च आलेला नसून येथील व्यवस्थापन सांभाळण्याची जबाबदारी संस्थेची आहे. यात प्रामुख्याने बारावी व पदवीधर शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना विविध क्षेत्रातले कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर या तरुणांना मोठ्या संस्थेमध्ये खात्रीदायक नौकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. या केंद्राचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “आजकालच्या आधुनिक युगामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध कौशल्य प्राप्त प्रशिक्षित युवकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. व्यावसायिक दृष्टिकोन हा प्रत्येक उद्योग व्यवसायाचा आत्मा आहे. त्यामुळे युवकांना रोजगार निर्मितीच्या उद्देशाने उद्योगधंदे निर्माण करणे हे जसं राजकीय व्यवस्थेचे कर्तव्य आहे, तसंच त्या उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. “

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा यांनीही आपल्या भाषणातून महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. “शिक्षण व्यवस्थेमधून केवळ पदवीधर तयार होण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम मिळेल, अशी कौशल्ये प्राप्त करून देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. हे प्रशिक्षण केंद्र केवळ तरुणांचे भविष्य उज्वल करेल असे नाही, तर राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदानही ठरेल. तसेच भविष्यातील गरजेनुसार आणखी असे प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येतील तसेच विविध क्षेत्रात प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचेही महापालिकेतर्फे स्वागत करण्यात येईल”

या कार्यक्रमावेळी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त प्रसाद शिंगटे, सहाय्यक आय़ुक्त (शिक्षण) दिपाली जोशी आणि इतर मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच निधी रामाणे (टेक महिंद्रा संचालक), अभिजीत बेडेकर (कोटक एज्युकेशन फाउंडेशन उन्नती प्रकल्प प्रमुख), आमिर ऐजाज (कोटक एज्युकेशन फाउंडेशन उन्नती प्रकल्प प्रमुख) आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यासह मोठ्या संख्येने मिरा भाईंदर शहरातील तरुण-तरुणी उपस्थित होते.

असे असेल कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या ३६ शाळांमध्ये शिकणाऱ्या साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी पार्श्वभूमी सारखी नसल्याने, त्यांना बांधकाम, डिलिव्हरी अशा असंघटीत क्षेत्रात काम करण्यास भाग पाडते. मात्र आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असावे याच विचारांच्या प्रेरणेतून विविध उपक्रम सुरू केले. या उपक्रमांतर्गत, कौशल्य प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रात, बँकिंग फायनॅन्शिअल सर्व्हिसेस अँड रिटेल सेल्स अँड इन्शुरन्स तसेच कस्टमर रिलेशनशिप अँड सेल्स हे दोन अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत असणार आहेत. या अभ्यासक्रमात विषयाव्यतिरिक्त इंग्रजी संवाद, व्यक्तिमत्त्व विकास, संगणक कौशल्य, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि तज्ज्ञ मार्गदर्शन हे सर्व ज्ञान दिले जाणार आहे. तसेच नोकरीची हमीही देण्यात आलेली आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम एप्रिल २०२५ मध्ये सुरू होणार आहेत. मोठ्या संख्येने तरुण विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे.