वसई : वसई विरार महापालिकेच्या कचरा भूमीवर साठलेल्या कचर्याचे डोंगर आता मोकळे होणार आहेत. साचलेल्या १५ लाख मेट्रीक टन कचर्याची विल्हेवाट लावलण्यासाठी सोमवारी पालिकेने ठेकेदाराला कार्यादेश दिले. २०१३ नंतर प्रथमच अशा प्रकारची प्रक्रिया होणार आहे. वसई विरार शहरात वाढत्या नागरिकरणामुळे दिवसेंदिवस दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे. दिवसाला साधारणपणे ७५० ते ८०० मॅट्रिक टन इतका कचरा गोखिवरे भोयदापाडा येथील कचराभूमीवर नेऊन टाकला जातो. २०१३ मध्ये पालिकेचा घनकचरा प्रकल्प बंद पडला होता. तेव्हापासून या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणताच प्रकल्प नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.
दरम्यान, या वाढत्या कचऱ्यामुळे आता कचरा भूमीची जागाही अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे सध्या स्थितीत एकावर एक असे कचऱ्याचे ढिगारे तयार होऊ लागले होते. मुळात दैनंदिन जमा होणारा कचरा आणि त्यात आधीच साठलेल्या कचर्याचे डोंगर यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या सोडविण्यासाठी पालिकेने या साचलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन २ मधून ४६ कोटींचा निधी मिळणार आहे. बायोमायनिंग प्रकल्पाच्या संदर्भातील कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबत साई युटिलिटी या खासजी कंपनीला हे काम देण्यात आले. याबाबतचे कार्यादेश संबंधित ठेकेदाराला सोमवारी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग कडून घेण्यात आले आहेत हा ठेका पुढील वीस वर्षासाठी असणार आहे.
हेही वाचा : वसई : अर्नाळा पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांना आग, १२ चारचाकी जळून खाक
अशी होणार कचऱ्यावर प्रक्रिया
हे काम डिमांड बिल्ड फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्स्फर (डीबीएफओ) या तत्वावर केले जाणार आहे पहिल्या टप्प्यात कचरा भूमीवर पडून असलेल्या १५ लाख मॅट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून जागा मोकळी करून घेतली जाणार आहे. यासाठी दोन वर्षे इतका कालावधी लागणार आहे. यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. सदर जागेवर प्रकल्पासाठी लागणारी आवश्यक इमारत उभारणे, मशीन खरेदी करणे व इतर साहित्य, मनुष्यबळ इत्यादी खर्च संबंधित कंपनी मार्फत करण्यात येणार असून होणारा खर्चाचा समावेश टीपिंग फी च्या माध्यमातून संबंधित कंपनीला प्रकल्प सुरु झाल्यानंतर देण्यात येईल. उपायुक्त (घनकचरा) डॉ. चारुशीला पंडित यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : ‘लोकसत्ता’च्या पाठपुराव्याल यश, राज्यातील सर्व खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्राची चौकशी होणार
यंदाच्या वर्षी प्रथमच वसई विरार महापालिकेने पर्यावरण अहवाल नुकताच सादर केला होता. त्या अहवालात कचऱ्याच्या समस्येबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरात दैनंदिन कचरा उचलून कचरा भूमीवर नेल्याच्या नंतर सुद्धा अनेक ठिकाणच्या भागात कचरा पडून असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. जवळपास ५० टक्के कचरा पडून राहत असल्याचे सांगण्यात आले होते. या नवीन कामामुळे कचर्याची ही समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.