वसई : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी वसई- विरार महापालिकेने प्रत्येक प्रभागातील सर्वाधिक थकबाकी असलेल्या शंभर जणांची (टॉप हंड्रेड) यादी तयार केली आहे. त्यांच्याकडून ही थकबाकी वसुल करण्याचे उद्दीष्ट संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.
वसई-विरार महापालिकेने ५०० कोटी रूपयांच्या मालमत्ता करासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. सप्टेंबर अखेर पर्यंत पालिकेने १४२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. ५०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी थकबाकी वसुल होणे गरजचे आहे. कारण ३०० कोटी रुपये हे थककाबीदारांनी थकवले आहे. ते वसुल झाले तर मालमत्ता कराचे ५०० कोटींचे उद्दीष्ट पूर्ण होऊ शकणार आहे. त्यामुळे पालिकेने मामलत्ता थकबाकीदारांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. शहरातील ९ प्रभागात मिळून ६ हजार ६५० मालमत्ता थकबाकीदार आहेत.
सर्वाधिक थकबाकी असणाऱ्या १०० जणांची यादी
या वसुलीसाठी पालिकेने प्रत्येक प्रभागात सर्वाधिक थकबाकी असणार्या पहिल्या १०० जणांची यादी बनवली आहे. संबंधित प्रभागातील कर्मचार्याना या शंभर जणांकडून वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. महिन्याभराच्या आत त्यांच्याकडून वसुली करायची आहे. नवीन कर वसुली करताना जुन्या थकबाकीदरांकडुन वसुली करम्ण्यावर भर देण्यात आला आहे. या थकबाकीदारांमध्ये अनधिकृत मालमत्ता, वाणिज्य मालमत्ता आदींचा समावेश आहे. थकबाकीदारांकडून वसुली झाल्यास उद्दीष्ट पूर्ण होईल आणि पालिकेच्या तिजोरीत भर पडेल अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (कर) समीर भूमकर यांनी दिली.