वसई : वर्ष संपले तरी वसई विरार महापालिकेच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या मुख्यालयातील कार्यालयातील साहित्य आता खराब होऊ लागले आहे. जुन्या मुख्यालयाचे नवीन इमारतीत लवकर स्थलांतरीत करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. वसई विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. त्यावेळी ४ नगरपरिषदा अस्तित्वात होत्या. महापालिकेच्या स्थापनेनंतर विरार नगर परिषदेच्या कार्यालयात पालिकेचे मुख्यालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले होते. मात्र महापालिकेच्या स्थापनेला १४ वर्षे उलटून गेली तरी अद्यापही नवीन मुख्यालय मिळालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, विरार पश्चिमेच्या परिवहन भवनाचे रुपांतर मुख्यालयात करण्यात आले. या मुख्यालयातील पहिल्या दोन मजल्यावर परिवहन भवन तयार करण्यात आले आहे आहे तर ३ ते ७ मजल्यांमध्ये मुख्यालय तयार कऱण्यात आले आहे. मात्र काम पुर्ण होऊनही नवीन मुख्यालयात कामकाज सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे या कार्यालयातील फर्निचर आणि इतर साहित्य आता खराब होऊ लागले आहे. लवकरात लवकर नवीन मुख्यालयात स्थलांतरीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा : वसई, भाईंदर मधून दररोज होतात ६ जण बेपत्ता, शोधासाठी पोलिसांची उदासीनता

विद्यमान कार्यालयात अडचण

पालिकेचे सध्याचे मुख्यालय विरार नगरपरिषदेच्या इमारतीत सुरू आहे. मात्र ती जागा अपुरी आहे. परंतु या इमारतीमध्ये जागेची कमतरता असल्याने छोटे छोटे भाग करून विभाग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेतील महत्वाची कागदपत्रे, दप्तर ठेवण्यापासून ते पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची यावेळी अडचण होत असते. तर काही वेळा नागरिकांना कामासाठी इकडून तिकडे फेऱ्या माराव्या लागत असतात. तर पावसाळ्यात सुध्दा छतावरून पाणी गळत असल्याने आणखीनच अडचणी वाढत असतात.

हेही वाचा : वसईकरांना सुर्याच्या योजनेतील अतिरिक्त ९० दशलक्ष लिटर्स पाणी; नवीन नळजोडण्यांची मात्र अद्याप प्रतीक्षा

मुख्यालयाची मुळ जागा इतिहासजमा

पालिकेचे मुळ मख्यालय विरार पश्चिमेच्या बोळींज येथे बांधण्याचे ठरविण्यात आले होते. २०१७ मध्ये पालिकेने विरार पश्चिमेच्या विराट नगर येथे दहा एकर प्रशस्त जागेत सहा लाख चौरस मीटर क्षेत्रफळ एवढी जागा देखील निश्चित करण्यात आली होती. तत्कालीन पालकमंत्री विष्णू सावरा, खासदार चिंतामण वनगा यांच्या नव्या मुख्यालयाच्या कामाचे २०१७ साली इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते या मुख्यालयाच्या जागेचे भूमीपूजन करण्यात आले होते. या मुख्यालयाचा खर्च ३०० कोटी रुपये इतका होता. या प्रस्तावित मुख्यालय इमारतीत नाट्यगृह आर्ट गॅलरी, वस्तू संग्रहालय, लग्नकार्यासाठी सभागृह, कॉन्फरन्स हॉल आदींचा समावेश होता. पंचतारांकित हॉटेल्स प्रमाणे त्याची रचना करण्यात आली होती आणि तीन वर्षात पूर्ण केले जाणार होते. पालिकेच्या २०१८ च्या दैनंदिनीत या नवीन मुख्यालयाचे संकल्पचित्र प्रसिध्द करण्यात आले होते. मात्र आता मुख्यालयाची ही मुळ जागा इतिहास जमा झाली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipal headquarter inauguration delayed the furniture and materials began to rust css
Show comments