वसईला आलात तर मोकळी, हिरवीगार गर्द झाडी असलेली जागा एकदा मनभरून बघून घ्या… कदाचित पुढच्या वेळी आलात तर ती मोकळी जागा दिसणार नाही, तो हिरवा पट्टा, वनराई दिसणार नाही… कारण तो पर्यंत तेथे अतिक्रमण झालेले असेल. बकाल चाळी उभ्या राहिलेल्या दिसतील…नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फॉरेस्ट अहवालात पालघर जिल्ह्यासह वसई विरारचा वनक्षेत्राचा पट्टा ३५ टक्क्यांनी कमी झाला आहे… त्यामुळे या उरलेल्या शिल्लक असलेल्या वसईच्या सौंदर्याला वसईला मनसोक्त बघून घ्या..
मागील महिन्यात एका वनक्षेत्रपालावर लाच मागण्याचा गुन्हा दाखल झाला. त्या वनक्षेत्रपालाने एका प्रकरणात २० लाखांची लाच मागितली होती. त्याच्या घरात दिड कोटीची रोकड आणि लाखो रुपयांचे दागिने आढळले होते. ज्या वनाधिकार्यांकडे जंगलाचे रक्षण करण्याची, जंगलाचे संवर्धन करण्याची जबाबदारी असते ते काय ‘दिवे’ लावतात याचे हे बोलके उदाहरण आहे. कारण नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालाने एक भीषण वास्तव समोर आणलं आहे. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ (आयएसएफआर) या संस्थेने राज्यातील वनक्षेत्राच्या सद्यस्थितीचा अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालानुसार पालघर जिल्ह्यातील ८७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र घटल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजे जिल्ह्याच्या जंगल, वनक्षेत्रात ३५ टक्के कमी झाला आहे. ही बाब केवळ चिंतेची नसून धोक्याची घंटा आहे.
हेही वाचा : मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
पालघर जिल्ह्यात वनक्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार आहे. पश्चिमेला सागरी किनारा, पूर्वेकडे डोंगर असल्याने हा जिल्हा निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी ओळखला जातो. जिल्ह्यातील नैसर्गिक जंगलामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात असतो. पर्यावरणाच्या अनुषंगाने जंगलाचे व पशुपक्ष्यांचे संवर्धन व्हावे म्हणून वन विभागामार्फत एकूण २४८.३८ चौरस किलोमीटर राखीव क्षेत्राची घोषणा वनविभागाने केली होती. त्यानुसार जव्हार (११८.२८) डहाणू ( ४९. १५) आणि धामणी येथे धामणीमध्ये (८०.९५) चौरस किलोमीटर राखीव वनक्षेत्रे आहेत. याशिवाय पालघर, वसई, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा तालुक्यात वनहक्क पट्ट्यांचे क्षेत्र २८ हजार ९०० हेक्टर इतके आहे. मात्र भूमाफियांनी अनधिकृत बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणवर जंगलतोड करून वनक्षेत्रावर कब्जा करण्यास सुरवात केली आहे..वनखात्याच्या जमिनीवर राजरोस अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे होत आहे. यामुळे जिल्ह्यातील हिरवा पट्टा नष्ट होऊ लागला आहे. जिल्ह्यातील ८७ चौ.कि.मी. म्हणजेच एकूण वनक्षेत्राच्या ३५ टक्के वनक्षेत्र घटले आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षातील ही घट आहे. राज्यातही फार काही चांगली स्थिती नाही. राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांनी एकूण १ हजार ७७८ चौरस किलोमीटर खुले जंगल आणि २६७ चौरस किलोमीटर झुडपी जंगल गमावले आहे.
वसईचं चित्र काय…?
वसईला विपुल निसर्गसंपदा लाभली आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरीकरण झपाटयाने वाढू लागलं असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होऊ लागली. आरक्षित शासकीय जमिनींपासून वनजमिनींवर बेसुमार अनधिकृत बांधकामे होऊ लागली. बांधकामे एवढ्या वेगाने होत असतात की आज दिसलेली मोकळी जागा उद्या तशीच मोकळी असेलच याची शाश्वती नसते. कारण त्या जागेवर अनधिकृत बांधकामे होत असतात. वनखात्याच्या जमिनी तर भूमाफियांसाठी जणू आंदणच दिल्यासारख्या आहेत. भ्रष्ट वनअधिकारी भूमाफियांच्या मदतीला तत्परच असतात. त्यामुळे वसई पूर्वेच्या राजावली, वाघरळ पाडा आदी जागांवर जंगल नष्ट करून, डोंगर नष्ट करून अनधिकृत चाळींचं विश्वच उभं राहिलं आहे. कांदळवनांची कत्तल करून भराव करून बांधकामे होत आहे. सध्या नालासोपारा येथील अग्रवाल नगरी मधील ४१ अनधिकृत इमारतींचं प्रकरण गाजत आहे. विविध विकासकामांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर भूमाफियाने अतिक्रमण करून अनधिकृत बांधल्या. आता या इमारतींवर कारवाई सुरू आहे. पण या ४१ इमारती बांधणारा भूमाफिया काय करतोय? तो फक्त साडेतीन महिने तुरूंगात होता. सध्या तो नायगाव पूर्वेच्या जुचंद्र येथील सागरी नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) बेकायदेशीर चाळी बांधत आहे. या पाणथळ जागेवर मोठ्या प्रमाणवार मातीचा भराव करण्यात आला आहे. चाळी बांधण्यासाठी येथील तिवरांच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे. पालिकेकडे तक्रार करून अर्थातच कारवाई नाही. हेच चित्र सगळीकडे दिसत आहे. नियम पायदळी तुडवून, तिवरांच्या कत्तली करून, जंगले नष्ट करून बेकायदेशीर बांधकामे होत आहे. त्यावर कुमाचे अंकुश नाही. आधीच अनधिकृत बांधकामे त्यातून आलेले परप्रातियांनी वसई बकाल केली आहे. आता हरित पट्टाही नष्ट होऊ लागला आहे.
हेही वाचा : नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
वसईला मन भरून बघून घ्या…
वसईचा हरित पट्टा नष्ट होत असल्याने पुढील काळातील वसई भकास असणार आहे. ९० च्या दशकात हरित वसई चळवळ सुरू झाली होती. त्यावेळी वसईतील जंगले, हरित पट्टा नष्ट होण्याचा धोका वर्तविण्यात आला होता. कालांतराने चळवळ थंडावली. परिणामी वसईचा हरित पट्टा नष्ट होण्याचा वर्तवलेला धोका आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे. वसईत नव्याने आलेले सहज बोलून जातात.. वसई किती बदलली आहे. पूर्वी इथे मोकळी जागा होती आता ओळखताच येत नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत आहेत की मोकळ्या जागाच शिल्लक रहात नाही. वसई पूर्वेकडील जगंल तर वणव्यापेक्षाही प्रचंड वेगाने या अतिक्रमणांमुळे नष्ट होत आहेत. पूर्वी लोकल ट्रेनने वसईला येताना भाईंदर सोडताच गारवा जाणवत होता. आता तो गारवा, प्रसन्नता राहिली नाही. जिकडे तिकडे बकालपणा आणि गर्दी. त्यामुळे उरलेल्या वसईला आता डोळे भरून बघून घ्या.. कारण उद्या तेही डोळ्यांना दिसणार नाही. जो हरित पट्टा आता शिल्लक आहे, जी जंगल, डोंगरं दिसत आहे ती उद्या नसतील.. आजची वसई उद्या नसेल.. ती दिसले पुस्तकात, छायाचित्रांत आणि आठवणीत…