वसई: मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे घेण्यात येत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीच्या वेळी ३ उमेदवारांकडे उत्तेजक पदार्थांचे साहित्य आढळले आहे. या ३ उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे सध्या पोलीस भरती सुरू आहे. त्यासाठी भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदानात शारिरीक चाचणी परिक्षा संपन्न झाली. यावेळी अमली पदार्थ विरोधी पथक मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तैनात होते.
हेही वाचा : शहरबात : चिमुकल्यांचा आक्रोश कुणी ऐकेल का?
त्यांनी केलेल्या तपासणीत ३ उमेदवारांकडे उत्तेजक पदार्थ सेवन करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. या ३ उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यांच्याविरोधात मिरा रोड पोलीस ठाण्यात औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मागील वर्षी पार पडलेल्या पोलीस भऱती प्रक्रियेत ९ पात्र उमेदवारांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनवाट प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून बाद करण्यात आले होते.