वसई: वसई विरारच्या किनारपट्टीवर पुन्हा वाळू माफिया सक्रिय झाले आहेत. मंगळवारी जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि भरारी पथकाने संयुक्त कारुई करून विरार जवळील काशीद कोपर येथे अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या एकूण ४ बोटी जप्त केल्या. नंतर या बोटी आणि सक्शन पंप जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या.

वसई विरार बहुतांश भाग हा किनारपट्टीचा परिसर आहे. विरार जवळील भागात वैतरणा व शिरगाव, नारिंगी खाड्यामध्ये छुप्या मार्गाने सक्शन पंप लावून वाळू उपसा होत असतो. या भागत वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. मंगळवारी खनिकर्म अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकमे काशिदकोपर किनाऱ्यावर छापा घातला. कारवाईची कुणकुण लागताच वाळू माफिया फरार झाले. मात्र पथकाने अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या ४ बोटी जप्त केल्या. या ४ बोटी आणि वाळू उत्खनन करण्यासाठी वापरला जाणारा सक्शन पंप जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून नष्ट करण्यात आल्या. भरारी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी संदीप पाटील, अधिकार शुल्क निरीक्षक मारोती सुर्यवंशी, मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे विजयकुमार मींड, विलास पाटील, अनिकेत काळेल आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा – सांगलीची जागा अखेर काँग्रेसनं सोडली; महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर, पाहा कोण कुठून निवडणूक लढवणार?

कांदळवनाला धोका

या किनारपट्टीच्या लगत व खाडी किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवनांची वृक्ष आहेत. यामुळे किनाऱ्यावरील जैवविविधता व पर्यावरण संतुलन होण्यास मदत होते. मात्र मागील काही वर्षापासून या किनारपट्टी लगत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा केला जाऊ लागला आहे. याचा मोठा परिणाम हा विविध भागावर होऊ लागला आहे.

हेही वाचा – जैसे ज्याचे कर्म तैसे! कंपनीला गंडा घालून मिळवलेले १ कोटी रुपये ‘फ्रॉड स्कीम’मध्ये गमावले

विरार जवळील वैतरणा खाडीतही मागील काही वर्षांपासून छुप्या मार्गांने बेकायदेशीर वाळू उत्खनन केले जाते. याचा परिणाम हा खाडीत व खाडी किनारी असलेल्या कांदळवन क्षेत्रावर होऊ लागला आहे. सक्शन पंप लावून हे उत्खनन होत असल्याने हळू हळू खाडी जवळील भाग खचू लागला आहे.