वसई : वसई-विरार शहरात कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसवून दुचाकी दामटवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आजवर २४० जणांवर कारवाई केली आहे. आवाजाची मर्यादा ओलांडली जात असल्याने रस्त्यांवर चालणाऱ्या नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई-विरार शहरात अनेकांनी दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल केला आहे. यात दुचाकीला कर्णकर्कश ‘सायलेन्सर’ बसविण्यात येतो. काही जण विविध प्रकारच्या आवाजाचे हॉर्नही बसवितात. दिवसेंदिवस दुचाकी वाहनांत बदल करून चालवितात. रस्त्यावरून जेव्हा अशा प्रकारच्या दुचाकी धावतात तेव्हा त्यातून कर्णकर्कश आवाज बाहेर पडतो. त्यातून ध्वनिप्रदूषण होतेच. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

काही वेळेस दुचाकीस्वार मागून येऊन असे कर्णकर्कश हॉर्न वाजवीत असल्याने नागरिक मोठय़ा आवाजाने दचकत आहेत.

गॅरेजवाल्यांची मदत

दुचाकीचालक आपल्याकडे सर्वाचे लक्ष वेधले जावे या उद्देशाने हा प्रकार करीत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी वसई विरार विभागाच्या दोन्ही वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम आखली आहे. आतापर्यंत यंदाच्या चालू वर्षांत वाहतूक पोलिसांनी २४० दुचाकीस्वारांवर कर्णकर्कश आवाजातील सायलेन्सर व हॉर्न बसविल्यामुळे कारवाई केली आहे. त्यांच्या कडून २ लाख ४० हजारांचा दंडही वसूल केला असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. तर काही वेळा कारवाईमध्ये चक्क गॅरेजवाल्याला सोबत ठेवून दुचाकीचे कर्णकर्कश आवाजातील सायलेन्सर जागीच काढून टाकण्यात आले असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar traffic police begin drive against loud silencers and pressure horns on two wheelers zws