वसई- शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १२ उड्डाणपुलांच्या रचनेत आता बदल करण्यात आला आहे. सलग वाहतूक करता यावी यासाठी १२ पैकी ३ उड्डणपूल एकमेकांना जोडण्यात येणार असून उर्वरित २ उड्डाणपूल आता रेल्वे उड्डाणपुलात रुपांतरीत केले जाणार आहे. यामुळे १२ उड्डाणपुलांऐवजी शहरात ७ उड्डाणपूल होणार आहेत.
वसई विरार शहराची लोकसंख्या वाढत असून नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. शहरातील रस्ते अरुंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरात अंतर्गत वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी १२ उड्डाणपुलांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पहिला प्रस्ताव २०१४-१५ मध्ये देण्यात आला होता. तेव्हा या १२ उड्डाणपुलांसाठी अडीचशे कोटींचा खर्च अपेक्षित होता. नुकतीच एमएमआरडीएने शहरातील विस्तारीत पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत रस्ते आणि उ्डाणपुलांसाठी २ हजार ३२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानुसार एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी वसई विरारमध्ये भेट देऊन या उड्डापुलांच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी १२ प्रस्तावित उड्डाणपुलांच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा – भाईंदर मधील मीठ विभागाच्या जागेवरील शौचालय ताब्यात घेण्यासाठी ४ कोटीचा खर्च
१२ ऐवजी होणार ७ उड्डाणपूल
या उड्डाणपुलांमध्ये माणिकपूर नाका, बाभोळा नाका, वसंत नगरी, रेंज ऑफीस, (वसईत) पाटणकर पार्क, लक्ष्मी शॉपिंग सेंटर, चंदन नाका (नालासोपारा) बोळींज खारोडी नाका, सायन्स गार्डन, फुलपाडा, मनवेलपाडा, नारिंगी (विरार) अशा १२ उड्डापुलांचा समावेश होता. मात्र सर्वेक्षणानंतर एकाच रस्त्यावर दोन पूल असल्याने ते एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विरारचा खारोडी नाका बोळींज-सायन्स गार्डन उड्डाणपूल आणि मनवेल पाडा- फुलपडा हे उड्डाणपूल एकमेकांना जोडले जाणार आहे. तर वसईतील माणिकपूर नाका आणि बाभोळा पूल एकमेकांना जोडले जाणार आहे. नालासोपारामधील लक्ष्मी शॉपिंग सेंटर जंक्शन आणि श्रीप्रस्थ पाटणकर पार्क येथील प्रस्तावित उड्डाणपूल रेल्वे उड्डाणपुलात रुपांतरीत केले जाणार आहे. त्यामुळे पुलांची संख्या १२ वरून ७ होणार आहे. वाहनचालकांच्या सोयींसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांना सलग प्रवास करता येईल आणि प्रवास अधिक सुखकर होईल, अशी माहिती वसई विरार महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे यांनी दिली. उड्डाणपुलांचे ठिकाण (लोकेशन) तेच आहे मात्र संख्या कमी झाली आहे. नव्या रचनेमुळे अंदाजित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ३ उड्डाणपूल जोडले जाणार
१) माणिकपूर नाका- बाभोळा नाका (वसई)
२) मनवेलपाडा- फूलपाडा (विरार)
३) सायन्स गार्डन- खारोडी नाका (विरार)
हे ४ पूल स्वतंत्र राहणार
१) वसंत नगरी (वसई)
२) नारिंगी साईनाथ नगर (विरार)
३) रेंज ऑफिस गोखिवरे (वसई)
४) चंदन नाका (नालासोपारा)
२ पूल आरओबीमध्ये रुपांतरीत होणार
पाटणकर पार्क आणि लक्ष्मी शॉपिंग सेंटर नाका (नालासोपारा)