वसई- रक्षाबंधनासाठी भावाला भेटायला निघालेल्या महिला आणि तिच्या पतीचे दुचाकीच्या अपघातात निधन झाले. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला होता. नंतर त्याला मांडवी पोलिसांनी अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेमा उपाध्याय (६२) या पती रुपचंद उपाध्याय (६२) आणि मुलगा संदीप आणि सुनेसह मिरा रोडच्या पूनम विहारमधील आविष्कार गार्डनमध्ये राहतात. प्रेमा उपाध्याय यांचा भाऊ विरारमध्ये राहतो. सोमवारी रक्षाबंधनाचा सण असल्याने त्या भावाला राखी बांधण्यासाठी निघाल्या होत्या. रविवारी संध्याकाळी ते पती रुपचंद उपाध्याय यांच्या दुचाकीवरून (हिरों होंडा स्पेलंडर- एमएच ०४ बीए ३९००) निघाल्या होत्या. रविवारी रात्री भावाकडे मुक्काम करून सोमवारी राखी बांधून त्या परतणार होत्या. उपाध्याय दाम्पत्य विरारला जाण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरून निघाले होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमरास ते पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाच असताना रिलायबल सोसायटीसमोर एक भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने (आरजे ३० जीए ९२२५) दुचाकीला धडक दिली. ही घडक एवढी जोरात होती की उपाध्याय दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उपाध्याय कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – मनवेलपाडा तलावात डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारणार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

हेही वाचा – दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. पेल्हार पोलिसांनी सीसीटीव्हीवरून त्याच्या ट्रकचा क्रमांक मिळवला होता. त्याची माहिती महामार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली होती. मांडवी पोलिसांनी फरार ट्रकचालक प्रकाशचंद्र रावत (३०) याला अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) २८१, १२५ (ए) १३५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १८७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai woman died on the spot along with her husband in a two wheeler accident ssb