वसई- नालासोपार्याच्या यादवेश विकास इंग्रजी शाळेतील १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या बलात्कार प्रकरणानंतर १० दिवसांनी मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांविरोधात पोक्सोच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलाने या लैंगिक छळाबाबत त्यांना माहिती असूनही त्यांनी कारवाई न करता पीडितेच्याच भावाला मारहाण केली होती.
नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथे यादवेश विकास इंग्रजी शाळा आहे. या शाळेत ९ वीत शिकणार्या १४ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षक अमित यादव हा मागील ५ महिन्यांपासून धमकावून बलात्कार करत होता. त्यापूर्वी २०२२ मध्ये दुबे पीडित मुलीचा लैंगिक छळ करत होता. हा प्रकार पीडित मुलीने पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांना सांगितला होता. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याबाबत पीडित मुलीचा भाऊ विचारणा करण्यासाठी गेला असताना त्याला मुख्याध्यापक विकास यादव याने मारहाण केली होती. जर त्याच वेळी शाळेने कारवाई केली असती तर माझ्या बहिणीवर बलात्कार झाला नसता असे पीडित मुलीच्या भावाने सांगितले. या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी फिर्यादी मुलीचा नव्याने पुरवणी जबाब नोंदवून घेतला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापक विकास यादव आणि पर्यवेक्षक संतलाल यादव याच्याविरोधात पोक्सोच्या कलम २१ (२), आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – भाईंदर खाडीत राज्यातील पहिला डबलडेकर पूल, वर मेट्रो आणि खाली वाहनांसाठी पूल
हेही वाचा – सरकारच्या निषेधार्थ महिला संतप्त; लाडकी बहीण योजनेचे पैसे केले परत
काय आहे प्रकरण?
आरोपी अमित दुबे (३०) हा नालासोपार पूर्वेच्या संतोषभुवन येथील यादवेश विकास इंग्रजी शाळेत शिक्षक आहे. तसेच तो वलईपाडा येथे उज्वल नावाचे खासगी शिकवणी वर्ग (क्लासेस) घेतो. या शाळेत शिकणार्या १४ वर्षाच्या विद्यार्थिनीवर त्याने क्लासमध्ये शिकविण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर वारंवार तिला धमकावून तिच्या शाळेत तसेच शिकवणी वर्गात बलात्कार करत होता. मार्च ते जुलै असे ५ महिने तो या विद्यार्थिनीवर बलात्कार करत होता. पेल्हार पोलिसांनी आरोपी अमित दुबे याला भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२) (एफ) ६५(१) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) च्या कलम ४, ५. ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या शाळेतील २५ हून अधिक मुलींवर अशाप्रकारे लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
© The Indian Express (P) Ltd