वसई: वसई पूर्वेच्या नागले येथे दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर झालेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हितेश मुकादम (३२) असे या तरुणाचे नाव आहे.
हितेश मुकादम हा नागले गावातील रहिवासी असून तो आई वडील, पत्नी यांच्या सोबत राहत होता. तीन वर्षापूर्वीचा त्याचा विवाह झाला होता. गुरुवारी सायंकाळी चारच्या वाजता कामण भिवंडी रोडवरून स्कुटीवरून प्रवास करत होता. परंतु नागले गावाजवळ रेल्वेच्या वाहिन्या टाकण्याचे काम सुरू असल्याने एक मार्गिकेवरून वाहतूक सुरू होती. याच दरम्यान आर वन ५ व स्कुटी या दोन वाहनांची समोरासमोर धडक लागून अपघात घडला. या अपघातात हितेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा – वसई- पालिकेची ११ आरोग्य केंद्रे सेवेत
या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घडलेल्या अपघाताची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
हेही वाचा – वसई : प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार, फरार आरोपीला ४ वर्षांनी अटक
सूचना फलक न लावल्याने अपघात
आधीच कामण भिवंडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यातच वसई दिवा मार्गिकेवर नवीन रेल्वे वाहिन्या अंथरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील रस्ता अरुंद झाला असून एकाच मार्गावरून वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी कामाच्याबाबत व सुरक्षेसाठी कोणतेच सूचना फलक न लागल्याने अपघात घडला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.