वसई : पालघर जिल्ह्यची निर्मिती होऊन १ ऑगस्ट रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र वसई तालुक्याच्या नागरिकांच्या कामकाजाच्या दृष्टीने अप्पर व उपजिल्हाधिकारी स्तराचे कार्यालय नसल्याने आजही वसईतील नागरिकांना पालघर येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेने सर्वाधिक लोकसंख्या  वसई तालुक्यात आहे. विविध प्रकारच्या कामांसाठी वसई, विरारमधील नागरिकांना पालघर येथे जावे लागत आहे. वसईपासून पालघर हे अंतर ५० ते ६० किलोमीटरचे.  पोहचण्यासाठी सुमारे एक ते दीड तास वेळ लागतो. यात वेळ आणि पैसेही वाया जातो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यालयाच्या ठिकाणी जाण्यासाठी वसईतून थेट परिवहन सेवा नाही.  महामार्गावरील वाहनांना  थांबवून तर काहीवेळा लोकलचे धक्के खात जावे लागते. कार्यालयाच्या ठिकाणी  एखाद्या विभागातील अधिकारी अनुपस्थित असल्यास  पुन्हा फेऱ्या माराव्या लागतात. वसईत  नागरिकांची जिल्हा स्तरावरील कामकाज पूर्ण होईल, असे कार्यालय सुरू करायला हवे असे सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी सांगितले आहे. तर वसईतून पालघर येथे जाणे खर्चिक बाब आहे. एका फेरीत काम होईल, याची शाश्व्ती नसते,  असे संक्षम ग्राहक चळवळीचे सरसिटणीस शंकर बने यांनी सांगितले.

रुग्णालय व महत्वाची कार्यालये कधी होणार?

जिल्हा रुग्णालय नसल्याने नागरिकांना अजूनही मुंबई सारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. यासाठी अशी रुग्णालये शहरात तयार होणे गरजेचे आहे.  नागरी आरोग्याच्या दृष्टीने अन्न औषध प्रशासनाचे कार्यालयही जिह्यत असायला हवे परंतु तेही नाही. टपाल विभागाचे मुख्य कार्यालय सुद्धा   मिरारोड येथे आहे. अशी महत्वाची कार्यालये  जिल्ह्यच्या व शहराच्या ठिकाणी कधी तयार होतील असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

वसईतील जनतेची बहुतांश कामे जिल्हा कार्यालयाशी संबंधित असतात. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे वसई तालुक्याच्या ठिकाणी असायला हवे. -सुशांत पाटील, अध्यक्ष, भूमिपुत्र फाऊंडेशन, वसई