वसंत नगरी मैदानात विरोध डावलून पालिकेने मेळाव्याला परवानगी दिली. अवघ्या १७ हजार रुपयांसाठी मैदान भाड्याने दिले आणि एका तरुणाचा वीज दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. या घटनेनेंतर विविध मैदानांवर होणार्‍या मेळाव्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील समोर आला आहे. मुळात कुणाच्या दबावामुळे परवानगी दिली हे उघड होणे गरजेचे आहे.
वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथे खेळाचे मैदान आहे. या मैदानात ७ मार्च ते २३ मार्च या कालावधीत होळी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. अमित कुमार तिवारी नावाच्या मुंबईतील एका राजकीय पक्षाच्या जवळच्या असलेल्या व्यक्तीने हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात विविध मनोरंजनाचे आणि खेळण्याचे साहित्य आणण्यात आले होते.
सोमवार २४ मार्चच्या रात्री काही तरुणांचा ग्रुप मेळाव्यात फिरण्यासाठी आला होता. हे तरुण मेळाव्यात आकाशपाळणा बघत होते. त्यावेळी हर्ष सेन (२१) या तरुणाने तेथील एका जाळीला हात लावला. त्याचवेळी आकाशपाळण्यातून आलेला वीज प्रवाहाचा झटका त्याला लागला आणि तो खाली कोसळला. त्याला उपचारासाठी तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. हर्ष हा नालासोपारा येथील संयुक्त नगर मध्ये राहणारा होता. तो इन्स्टाग्रामवर रिल बनवायचा. या प्रकारामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले. हर्ष सोबत असलेले मित्र आणि अन्य नागरिकांनी मेळाव्यात असलेल्या साहित्याची तोडफोड केली.

मेळाव्यात दुर्घटनेची शक्यता वर्तवली होती.

वसंत नगरी हा निवासी संकुलाचा परिसर आहे. येथे खेळण्याचे हे एकमेव मैदान आहे. त्याचा व्यावसायिक कार्यक्रम, लग्न समारंभ आदींसाठी स्थानिकांचा विरोध आहे. मात्र हा विरोध डावलून कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सामाजिक न्याय विभागाने ६ मार्चला आयुक्त अनिलकुमार पवार यांना लेखी पत्र पाठवून या मेळाव्याची परवानगी रद्द करण्याची मागणी केली होती. मेळाव्यात बेकायदेशीर वीजेचा वापर होत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे अशी सावधगिरीची सुचना देखील पत्रात केली होती. मात्र तरी त्याकडे दुर्लक्ष कऱण्यात आले.

हे मैदान प्रभाग समिती ‘ड’ (आचोळे) च्या अखत्यारित येते. हे मैदान विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मैदानात कुणालाही भाड्याने देऊ नये असे लेखी पत्र २४ फेब्रुवारी रोजी प्रभाग समिती ‘ड’ च्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांनी या परवाना विभागाला दिल्याचे उघड झाले आहे. मात्र तरी देखील पालिकेने या मैदानात मेळाव्याला परवानगी दिली होती. हे अधिक धक्कादायक आहे. या मैदानाचे भाडे प्रतिदिन १ हजार रुपये होते. म्हणजे या तरुणाचा बळी १७ हजार रुपयांसाठी गेला असे खेदाने म्हणावे लागत आहे.

परवानगी कुणाच्या दबावाने ?

या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केले. मयत तरुणाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी, दोषी अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी, वसंत नगरी मैदान खेळासाठी राखीव ठेवण्यात यावे, मैदानाची मालकी वसंत नगरी फेडरेशनकडे देण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली. यावेळी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पण मूळ प्रश्न कायम आहे तो म्हणजे एवढा विरोध असताना पालिकेने परवानगी दिलीच का आणि कुणाच्या सांगण्यावरून या प्रश्नांचे उत्तर मिळणे गरजेचे आहे.

प्रभाग समिती ‘ड’ मधून पत्र प्राप्त झाले होते. परंतु मैदानाला संरक्षक भींत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आम्ही १७ मैदान भाड्याने दिले होते. ही दुर्घटना घडताच आम्ही परवाना रद्द केला असून पोलीस ठाण्यात तक्रार दिली असे पालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र ही सारवासारव असून त्याने मूळ प्रश्न सुटणारे नाहीत.

शहरातील मेळाव्यांच्या सुरक्षेचे काय?

पालिका मैदान केवळ भाड्याने देते त्याची सर्व जबाबदारी ही परवानाधारकाची असते. सुरक्षेच्या नियमांच्या अधीन राहून अटी शर्थींचे पालन करण्याच्या सूचना आयोजकांना दिलेल्या असतात असं पालिका सांगत आहे. शहरातील पालिकेच्या मालकीची तसेच खासगी मैदाने आहेत. त्यावर सुट्टीच्या काळात विविध मेळावे, जत्रा आणि विविध करमणुकीचे कार्यक्रम होत असतात. त्यात हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. मैदानात जत्रा, मेळावे आयोजित करायचे असल्यास कडक नियम आहे. विविध खेळांचे आणि मनोरंजनाच्या साहित्यासाठी भूमीगत वीजवाहत तारा टाकणे आवश्यक असते. त्याचे अग्नीसुरक्षा (फायर ऑडीट) आणि साहित्याच्या सुरक्षा प्रमाणपत्र (सेफ्टी सर्टिफिकेट) असणे बंधनकारक आहे. मात्र या प्रमुख नियमांचे उल्लंघन होत असते. वसंत नगरी येथील मैदानात वीज कुठू न घेतली होती? अग्निशमन दलाने ना हरकत दाखला दिला होता का? ते देखील प्रश्न आहेत.

शहरात या मेळाव्यांच्या अनेक गैरधंदे देखील चालत असतात. त्याची देखील तपासणी कधी केली जात नाही. हा केवळ एका मुलाच्या मृत्यूचा प्रश्न नाही तर ही धोक्याची घंटा आहे. शहरात जे ठिकठिकाणी मेळावे सुरू आहेत त्यातील सुरक्षेची हमी देता येणार आहे का? दुर्घटनेनंतर महापालिकेने खेळाची मैदाने फक्त खेळण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शहरातील खेळाच्या सर्व १७ मैदानांवर फक्त खेळ, क्रिडा स्पर्धा यासाठी आरक्षित असतील, त्यात कुठल्याही प्रकारच्या राजकीय, धार्मिक आणि खासगी कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल.पण या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.