वाहनांच्या लांबच लांब रांगा ; कर्मचारीही ताटकळत
वसई : कचराभूमीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी असलेल्या पोकलेनमध्ये इंधन (डिझेल ) नसल्याने गुरुवारी पालिकेच्या शेकडो कचरा गाडय़ा अडकून पडल्या होत्या. जोपर्यंत गाडय़ा खाली होत नाहीत तोपर्यंत यात कर्मचाऱ्यांही उपाशीपोटी ताटकळत उभे राहावे लागले आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असा प्रकार घडला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथे पालिकेची कचराभूमी आहे. या कचराभूमीवर शहरातील जमा होणारा जवळपास सातशे मेट्रिक टनाहून अधिकचा कचरा गाडय़ात भरून विल्हेवाट लावण्यासाठी आणला जातो. सद्य स्थितीत पालिकेची कचरा विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प प्रक्रिया नसल्याने कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कचऱ्याच्या येणाऱ्या गाडय़ा खाली करून पोकलेनच्या साहाय्याने त्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र या पोकलेन यंत्र चालविण्यासाठी पालिकेकडून इंधनच उपलब्ध न करून दिल्याने पोकलेन बंद झाले आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया थांबली आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून कचऱ्याने भरलेल्या गाडय़ा जागच्या जागी उभ्या राहून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे.
जवळपास १० ते १२ तासांचा कालावधी उलटून गेला तरी इंधनाची कोणतीच सुविधा न झाल्याने कचऱ्याने भरलेल्या दुर्गंधीयुक्त गाडय़ा जागच्या जागी उभ्या होत्या. यामुळे आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे आज जर या गाडय़ा खाली झाल्या नाहीत तर शुक्रवारी सकाळी शहरातील कचरा गोळा करण्यासाठी गाडय़ा येतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला असून शहरात कचऱ्याचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इंधनाअभावी पोकलेनच बंद असल्याने सकाळपासून कचऱ्याच्या गाडय़ा घेऊन आलेल्या सफाई कर्मचारी व वाहतूक कर्मचाऱ्यांनाही उपाशीपोटी कचराभूमीवर तासनतास ताटकळत उभे राहवे लागले आहे. महापालिका प्रशासनाच्या ुढिसाळ कारभारामुळे करोनाकाळात कचऱ्याची समस्या निर्माण होऊन शहरात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे पुतळाजी कदम यांनी सांगितले आहे.