वसई: पालघर जिल्ह्यात उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) बसवून घेण्याकडे वाहनधारकांनी पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेली ४ लाख ५० हजार ६३० वाहने आहेत.त्यापैकी केवळ २८ हजार ६४० वाहनधारकांनी अर्ज दाखल केले आहेत.याचाच अर्थ फक्त ६.३५ टक्के इतकेच वाहन धारक पाट्या बसवून घेण्यासाठी पुढे आल्याचे चित्र दिसून येत आहे. आता पाट्या बसविण्यासाठी मुदत वाढ देऊन ३० जून करण्यात आली आहे.
वाहन धारक आपल्या वाहनांवर फॅन्सी वाहनक्रमांक लावून फिरतात.त्यामुळे ई-चलन द्वारे कारवाई केली जाते तेव्हा त्यांचे वाहन क्रमांक व्यवस्थित पणे नोंद होत नाही. तर काहीवेळा गुन्हेगार ही चोरीसाठी वाहनांच्या पाट्या बदलून छेडछाड करीत असतात. या प्रकारामुळे वाहनांचा शोध घेणे पोलिसांना कठीण जाते.
यासाठी आता राज्याच्या परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) बंधनकारक करण्यात आले आहे.यासाठी ३१ मार्चची मुदत दिली होती. मात्र संकेतस्थळावर तांत्रिक बाबींमुळे वाहनधारकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे पाटी (एचएसआरपी) बसवण्यात विलंब होत होता. वाहनधारकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, व पाट्या बसवून घेण्याकडे वाहनधारकांचे दुर्लक्ष लक्षात घेता आता परिवहन विभागाने ३० जून २०२५ पर्यंत मुदत वाढ दिली आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण ८ लाख ७५ हजार ६९४ इतकी वाहनांची नोंद परिवहन विभागाकडे आहे. यात ४ लाख २५ हजार ६४ वाहने ही एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झाली आहेत तर ४ लाख ५० हजार ६३० वाहने एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी केलेली आहेत. असे असतानाही वाहन धारक अजूनही उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या बसवून घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. साडेचार लाखांपैकी आतापर्यंत पालघर जिल्ह्यातील ९ केंद्रावर आतापर्यंत २८ हजार ६४० इतक्या वाहनधारकांचे अर्ज सादर झाले असून त्यापैकी केवळ ७ हजार ३५५ वाहन धारकांनी वाहन पाटी बदलून घेतली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. याचाच वाहनांची उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी बसवून घेण्याचा आकडेवारी पाहता जिल्ह्यात केवळ ६.३५ टक्के वाहनधारक वाहनांवरील पाटी बसवून घेण्यासाठी पुढे आले असल्याचे परिवहन विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दिलेल्या विहित वेळेत वाहनधारकांनी पुढे येऊन उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या लावून घ्याव्यात असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे. न लावल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
वाहन पाट्या बसवून घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहनधारकांनी आपल्या उच्च सुरक्षा पाट्या बसवून घ्याव्यात. यासाठी परिवहन विभागाकडून योग्य ते सहकार्य केले जात आहे.
अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई
एकत्रित वाहननोंदणी करू शकतात
उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी बसवून घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये असलेली वाहने, शासकीय कार्यालय अशा ठिकाणचे वाहनधारक यांनी एकत्रित येऊन वाहन नोंदणीसाठी तयार झाले तर तशी केंद्र चालकाला सूचना करून सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे परिवहन विभागाने सांगितले आहे.
अशी करावी नोंदणी
http://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे.
– अर्जासह पुढे जाण्यासाठी तुमचे कार्यालय निवडा.
– वाहनांचा क्रमांक टाका.
– ‘आरटीओ’ कार्यालयीन कक्षेनुसार विक्रेत्याचे संकेतस्थळ निवडावे.
– वाहन घेताना नोंदणी केलेला मोबाइल क्रमांक, वाहनाचा मुख्य तपशील त्यात भरणे
– वाहन स्वास्थ्य केंद्राची सोयीनुसार वेळ आणि तारीख निश्चित करावी.
– ऑनलाइन शुल्क भरावे. – निवडलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसार संबंधित केंद्रावर उपस्थित राहावे