लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : वर्सोवा खाडी पुलाजवळ घडलेल्या दुर्घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या राकेशकुमार या चालकाचा शोध अजूनही लागला नाही. मागील दिवसांपासून एनडीआरएफच्या पथकाकडून शोध कार्य सुरूच आहे.
बुधवारी रात्री ९ वाजता वर्सोवा खाडी पुलाजवळ सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू असताना भूस्खलन होऊन दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली पोकलेने सह चालक ही अडकून पडला आहे. राकेश कुमार यादव असे या चालकाचे नाव आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. यात मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा खचून गेला असून जवळपास ५० ते ६० फुट खचला आहे. त्यामुळे विविध उपाययोजना करून माती बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
आणखी वाचा-वसई : अनैतिक संबंधातून महिलेची हत्या; मतदार यादीवरून पटवली ओळख, स्प्रेवरून लावला छडा
दुसरीकडे आरसीसी ची भिंत ही त्यात कोसळली आहे. भिंत अवजड असल्याने त्याचे सर्व साहित्य बाजूला करताना अडचणी येत आहेत. खाडी किनाऱ्याचा परिसर असल्याने जमिनीखाली अधिकच दलदल आहे. त्यामुळे शोध घेणे आव्हानात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटना घडून दोन दिवस उलटून गेले तरीही अजूनही चालकाला बाहेर काढले नसून एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल यांचे प्रयत्न सुरूच आहेत.