वसई: मागील चार वर्षांपासून रखडलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. हे वसईतील अत्याधुनिक सुविधायुक्त असलेले एकमेव रुग्णालय असून या रुग्णालयात पशुवरील वैद्यकीय सेवा ही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

वसई विरार शहरात एकही शासकीय पशु वैद्यकीय रुग्णालय  नसल्याने जखमी पशूंना उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावे लागत होते. शहरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पशु प्राणी आहेत. काही वेळा पशु आजारी पडतात. तर काही वेळा रस्त्यावर वाहनांच्या धडका लागून व अन्य कारणामुळे जखमी होतात.  अशा वेळी जवळच्या भागात रुग्णालय नसल्याने नागरिकांना पशूंना घेऊन नवी मुंबई यासह इतर ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागते. त्यामुळे त्यांची चांगलीच परवड होत  होती .वसईत पशुवैद्यकीय शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी प्राणी प्रेमींनी सातत्याने केली आहे.तसेच दैनिक लोकसत्ता ने याबाबत सातत्याने वृत्त प्रसारित करून पशुवैद्यकीय रुग्णालयाचा मुद्दा लावून धरला होता. त्यानुसार वसई पश्चिमेच्या सांडोर येथे पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णालय उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ऑक्टोबर २०२१ पासून सुरू केले होते. मात्र विविध प्रकारच्या कारणामुळे या वैद्यकीय रुग्णालयाचे काम अगदी धीम्या गतीने सुरू होते.

अखेर हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण करून पशुवैद्यकीय विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे.  उभारण्यात आलेले रुग्णालय ६ हजार ८०० चौरस फुटांचे असून यासाठी सुमारे साडेतीन कोटीहून अधिकचा निधी खर्च करण्यात आला आहे.वसईतील हे सर्वात मोठे एकमेव पशुवैद्यकीय रुग्णालय असून त्यात पशुवरील उपचार ही सुरू करण्यात आले आहे.पशु उपचार सुरू झाल्याने पशु प्रेमींना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अशी मिळणार उपचार सुविधा

वसईत उभारण्यात येणारे पशुवैद्यकीय रुग्णालय हे सुसज्ज असे रुग्णालय आहे. एक्सरे , प्राण्यांवरील छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया, जखमीवर उपचार , प्राण्यांची तपासणी, लसीकरण, अशा वैद्यकीय सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत असे सहायक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ नकुल कोरडे यांनी सांगितले आहे. सुरवातीला हे उपचार हे उमेळा येथील धोकादायक अवस्थेत असलेल्या रुग्णालयात करावे लागत होते. आता इमारत सुरू झाल्याने प्राण्यांवर उपचार करणे अधिक सुलभ झाले आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.

मनुष्यबळ अपुरे

वसईत सद्यस्थितीत राज्य शासनाचे एक रुग्णालय इमारत व जिल्हा परिषदेचे ९ दवाखाने आहेत.आता उभारलेल्या रुग्णालयाच्या ठिकाणी एक डॉक्टर व अन्य दोन कर्मचारी असे केवळ तीन कर्मचारी आहेत. ते ही अपुरेच आहेत. इतक्या मोठ्या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे असेही येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण झाले आहे. ही इमारत पशुवैद्यकीय विभागाला आम्ही हस्तांतरण केली आहे. –संजय यादव, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत आम्ही ताब्यात घेतली आहे. त्यात आता पशु वरील उपचार व अन्य सेवा सुरू केल्या आहेत. हळूहळू यातील सर्वच सुविधा सुरू करण्यात येतील.डॉ.नकुल कोरडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग वसई

Story img Loader