वसई : वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन सेवेच्या बस चालकांकडून बेफिकीर पणे बस चालविल्याचा प्रकार समोर आला आहे. याची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे. अशा प्रकारच्या बेफिकीर पणामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाकडून शहरातील विविध ठिकाणच्या भागात परिवहन सेवा पुरविली जात आहे.वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे ही सेवा अपुरी पडू लागली आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागाकडे ९४ डिझेल बस ४० ई बस अशा १३४ बसेस आहेत. त्याद्वारे शहरातील ३६ मार्गावर सेवा दिली जाते.त्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात.

पालिकेच्या काही बसेस या फारच जुन्या झाल्या आहेत. अशा जुन्या झालेल्या बसेस काही बस चालक हे बेफिकीर पणे बस चालवित असल्याचे प्रकार समोर आले आहे. बुधवारी सकाळी विरार येथील वीर सावरकर मार्ग या भागात परिवहन सेवेची बस उड्डाण पुलाला धडकली होती. याशिवाय त्या बसचा आधी पासूनच मागील बाजूचा पत्रा ही बाहेर निघाला होता अशा स्थितीत ही बस चालक हा बस चालवित असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका नागरिकाने याची चित्रफीत ही समाज माध्यमावर प्रसारित केली आहे.

अशा बेफिकीर पणे बस चालविल्याने प्रवाशांना त्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. तो निघालेला पत्रा हा रस्त्याने जाणारे वाहन व पादचारी नागरिक यांना लागून दुर्घटना होण्याची भीती यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे.ज्या बस जुन्या झाल्या आहेत व ज्यांची अवस्था बिकट आहे अशा बस प्रवासासाठी वापरू नये अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. यापूर्वी सुद्धा नायगाव पूर्वेच्या भागात काही वाहन चालक बसची लाईट नसताना गाड्या चालवित असल्याचा प्रकार समोर आला होता.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरूच 

वसई विरार शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच बसने प्रवास करणारे प्रवासी वाढू लागले आहेत. काही मार्गावर फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे बस मध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून ही वाहतूक सुरू आहे. अनेकदा बस ही  एकाच बाजूला झुकलेली  असते अशा वेळी जर बस कलंडली तर मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.  विशेषतः नालासोपारा, वसई फाटा, भोयदापाडा ते नायगाव पूर्व या  मार्गावरून प्रवास करणाऱ्या बसेस मध्ये अधिक प्रमाणात गर्दी होत असते. यासाठी बसेसची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

सूचनांकडे दुर्लक्ष

मुंबईतल्या कुर्ला परिसरात एक भरधाव वेगात असणाऱ्या बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना चिरडले. या घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर महापालिकेचा परिवहन विभाग ही सतर्क झाला होता.वाहनचालकांना नव्याने प्रशिक्षणासोबतच त्यांच्या प्रवासी वाहतूक हालचालीवर करडी नजर ठेवली जाणार आहे.परिवहन सेवेत १७० इतके वाहनचालक आहेत.प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने चालक प्रशिक्षण , चालकांची निवड चाचणी, चालकाचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करून देणे, बेदरकारपणे वाहन न चालविण्यांच्या सूचना, वाहतुकी दरम्यान निर्माण होणाऱ्या अडचणी अशा सर्व बाबी समजून सांगण्यास सुरवात केली होती. मात्र काही चालक सूचनांचे पालन करीत नसल्याने धोकादायक वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे.