नागरिक मागणीवर ठाम, मुख्यमंत्र्यांना पत्र
वसई: वसई विरार महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पालिकेतून २९ गावे वगळण्यासाठी नागरिकही आक्रमक झाले आहे. गावे वगळण्याच्या मुद्दय़ावर नागरिक ठाम असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना रक्ताच्या स्वाक्षरीचे पत्र पाठविण्याची मोहीम सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्यात यावी, अशी मागणी वसईच्या ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी न्यायालयीन मार्गानेही लढा सुरूच आहे. करोनाकाळात पुढे ढकलण्यात आलेली महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी ही सुरू झाली आहे, परंतु आधी गावे वगळा आणि नंतर निवडणुका घ्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्राम स्वराज्य अभियानाने ही मोहीम तीव्र करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नुकताच यासंदर्भात वसई निर्मळ येथे बैठक घेण्यात आली व रक्ताचा अंगठा लावून मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांना भेटून गाव वगळण्याची कारणांचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. वसई विरार महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार आहे. याकरिता प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. हरकती सूचना मांडण्यासाठी वेळ निश्चित केली आहे, परंतु या हरकतीत केवळ सीमांकनाचा प्रश्न स्वराज अभियान माध्यमातून गावांबाबत आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. या बैठकीत काँग्रेसचे विजय पाटील, डॉमनिका डाबरे, ग्रामस्वराज्य अभियानचे समन्वयक मिलिंद खानोलकर, राजन पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना, पक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
वगळण्याची मागणी असलेली गावे
आगाशी, वटार, कोफराड, नाळे, राजोडी, वाघोली, नवाळे, निर्मळ, कौलार बुद्रुक, कौलारू खुर्द, भुईगाव खुर्द, भुईगाव बुद्रुक, सालोली, गिरीज, गास, कामण, देवदळ, कोल्ही, चिंचोटी, चांदीप, शिरसाड, ससुनवघर, कणेर, मांडवी, बापाणे, दहीसर, कोिशबे, कशिदकोपर, कसराळी २९ गावांचा प्रश्न न्यायालयात आहे. मात्र निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात. त्यासाठी आधी गावे वगळा आणि नंतर निवडणुका घ्या, अशी आमची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या वतीने रक्तसंदेश पत्र दिले जाणार आहे.
– मिलिंद खानोलकर, समन्वयक, ग्राम स्वराज्य अभियान