नारळी पौर्णिमेनंतर मासळी बाजार पुन्हा गजबजला
वसई: नारळी पौर्णिमेनंतर समुद्रात गेलेल्या बोटी परतू लागल्यानंतर वसईचा घाऊक मासळी बाजार पुन्हा गजबजू लागला आहे. वसईच्या पाचूबंदर आणि नायगाव येथे दररोज रात्री घाऊक मासळी बाजार सुरू झाला आहे. या बाजारात प्रत्येक रात्री कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र दुसरीकडे या बाजारातील विक्रेत्यांकडे मुखपट्टी नसून आंतरनियमांचे पालन केले जात नसल्याने करोना संसर्गाची भीती व्यक्त होत आहे.
मेपासून जवळपास अडीच महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमेनंतर पुन्हा मासेमारीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. समुद्रात गेलेल्या बोटी परतू लागल्याने वसईत घाऊक मासळी बाजाराला सुरवात झाली आहे. समुद्रातून बोटी परतल्यानंतर रात्री पाचूबंद आणि नायगाव येथे घाऊक मासळी बाजार लागतो. स्वस्तात मासे मिळत असल्याने खवय्यांची तेथे गर्दी असते.
पाचूबंदर येथील घाऊक मासळी बाजारात २७ प्लॉटस आहेत. तेथे रोज रात्री सुमारे ७०० ते ८०० विक्रेते माशांचा लिलाव करत असतात. बोईसर, पुण्यापासून थेट अलिबाग पर्यंतचे ग्राहक मासे घेण्यासाठी येत असतात. रात्री ९ नंतर हा बाजार सुरू होतो आणि तो रात्री १२ पर्यंत संपतो. एका प्लॉट मध्ये एका रात्री अडीच ते तीन लाखांची उलाढाल होतो. म्हणजे एका रात्रीत एका बाजारात ७५ लाख ते १ कोटी पर्यंत उलाढाल होते, अशी माहिती वसई सर्वोदय मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष संजय कोळी यांनी दिली. सुक्या माशांचा व्यवसाय लोप पावू लागल्याने महिला विक्रेत्यांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. या बाजारात स्वस्त आणि ताजे मासे मुबलक प्रमाणात मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांपासून विक्रेते आणि व्यापारी मासे खरेदी करण्यासाठी येत असतात. साधारण आठवड्याच्या तीन दिवस हा बाजार तेजीत असतो.
आश्वासनाकडे दुर्लक्ष
करोना नियमांचे पालन करून बाजाराचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन आयोजकांनी पोलिसांनी दिले होते. मात्र या ठिकाणी बाजारात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने विक्रेते माशांच्या लिलावासाठी दाटीवाटीने बसलेले दिसून येत आहेत. विक्रेत्यां महिलांनी मुखपट्टी लावेलली नसते तसेच अंतरही सोडलेले नसते असे येथे आलेल्या ग्राहकांनी सांगितले. यामुळे मोठी गर्दी होऊन करोनाचा धोका वाढेल अशी भीती ग्राहक संतोष म्हात्रे यांनी व्यक्त केली. बाजारानंतर या परिसरात मोठी वाहतूक कोंडी देखील होत असते. आम्ही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत असतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष कोळी यांनी मान्य केले. आम्ही वारंवार आवाहन करत असतो यापुढे त्याचे पालन योग्यरीत्या होईल याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले.